पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप, वाद पेटणार?हर्षवर्धन पाटील यांच्या कन्येचा अजित पवारांवर हल्लाबोल

बारामती लोकसभा मतदारसंघात खा. सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.
पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप, वाद पेटणार?हर्षवर्धन पाटील यांच्या कन्येचा अजित पवारांवर हल्लाबोल

विशेष प्रतिनिधी/मुंबई : बारामती लोकसभा मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत रंगण्याची चिन्हे आहेत. याची जोरदार तयारी सुरू असतानाच महायुतीतील मतभेद आता चव्हाट्यावर येत आहेत. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना सातत्याने दगाबाजी झाली आहे. त्यामुळे त्यांच्या कन्या अंकिता पाटील-ठाकरे यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर हल्लाबोल करीत त्यांनी तीनवेळा आमच्या पाठीत खंजीर खुपसला असून, आधी विधानसभेचे काय करणार, हे स्पष्ट करावे, तरच आम्ही पाठिंबा देऊ, असे म्हटले आहे. त्यामुळे महायुतीतील वाद चव्हाट्यावर आला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी अंकिता पाटील यांच्यावर टीका करीत महायुतीत मिठाचा टाकू नये, असे म्हटले आहे. त्यामुळे हा वाद वाढण्याची चिन्हे आहेत.

बारामती लोकसभा मतदारसंघात खा. सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून, बारामतीचा सातत्याने दौरा सुरू आहे. त्यातच महायुतीतील नेत्यांमध्ये साखर पेरणीही सुरू केली असून, मतदारसंघात महायुतीचा उमेदवार मैदानात उतरल्यास सर्वांनाच एकजुटीने काम करावे लागेल, असे सातत्याने सांगत आहेत. मात्र, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील मतभेद सर्वांनाच माहित आहेत. त्यामुळे हर्षवर्धन पाटील अजित पवार यांना साथ देणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

त्यातच हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांनी आम्ही कॉंग्रेस पक्षात असताना अजित पवार यांनी आम्हाला दिलेला शब्द तीनवेळा फिरविला. आमची फसवणूक करून आमच्या पाठीत खंजीर खुपसला, असा घणाघाती आरोप केला. सध्या आम्ही महायुतीत आहोत. अशा स्थितीत जे विधानसभेला आमचे काम करतील, त्यांनाच आम्ही लोकसभेत मदत करू, असे स्पष्ट सांगितले. एवढेच नव्हे, तर आम्ही इंदापूर विधानसभा निवडणूक लढविणारच, असा निर्धारही बोलून दाखविला. त्यामुळे या जागेवरून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार यांच्यातील वाद वाढण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे निवडणूक जाहीर होण्याअगोदरच महायुतीत धुसफूस सुरू झाली आहे.

अजित पवार नाराज

अंकिता पाटील-ठाकरे आणि राजवर्धन पाटील यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य करीत खंजीर खुपसल्याची भाषा केली. ऐन निवडणुकीच्या पुढे हा मुद्दा उपस्थित झाल्याने आणि महायुतीत असतानाही ऐनवेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या गटाने विधानसभा निवडणुकीचा मुद्दा उपस्थित केल्याने अजित पवार नाराज असल्याचे बोलले जात आहे.

मिटकरी यांचे प्रत्युत्तर

अंकिता पाटील आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे सुपुत्र राजवर्धन पाटील यांच्या आरोपानंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी अजितदादा हे शब्द पाळणारे नेते आहेत. ते कधीही शब्द फिरवित नाहीत. त्यामुळे खंजीर खुपसण्याची भाषा करून महायुतीत संभ्रम निर्माण करू नये. आपण सध्या महायुतीत आहोत, हे लक्षात घ्यायला पाहिजे, असे म्हटले. अंकिता पाटील जे बोलत आहेत, ते त्यांचे वैयक्तिक मत असू शकते. त्यांचे वय लहान आहे. सध्या लोकसभेची चाचपणी सुरू आहे, त्यानंतर विधानसभा होईल. त्यामुळे सगळे वेळेवर होईल. त्यावर इतकी घाई का, असा सवालही उपस्थित केला. त्यामुळे या मुद्यावरून आगामी काळात वाद वाढण्याची चिन्हे आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in