
मुंबई : विधानसभा निवडणुकीत अत्यंत निराशाजनक कामगिरी झाल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांच्या जागी नवा प्रदेशाध्यक्ष निवडण्यात येणार असल्याच्या गेले काही दिवस चर्चा होत्या. अखेर गुरुवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांनी नियुक्ती जाहीर केली. याचबरोबर खर्गे यांनी विजय वडेट्टीवार यांची काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून नियुक्ती करण्यासही मान्यता दिली.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावर नियुक्ती करताना ज्या नेत्याच्या संस्था नाहीत, अशा व्यक्तीची आणि आक्रमक चेहऱ्याची निवड करावी, असा राहुल गांधी यांचा आग्रह होता. त्यामुळेच हर्षवर्धन सपकाळ यांचे नाव निश्चित झाले, असे सांगण्यात येते. हर्षवर्धन सपकाळ हे राहुल गांधी यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात.
एनएसयूआय, युवक काँग्रेसच्या माध्यमातून हर्षवर्धन सपकाळ विद्यार्थी, युवक चळवळीत सक्रीय होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक यांच्या माध्यमातून ते काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या थेट संपर्कात आले. त्यानंतर वऱ्हाडासह संपूर्ण राज्यात युवक काँग्रेसच्या मजबूत बांधणीत सपकाळ यांची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली. त्यामुळे राहुल गांधी ब्रिगेडमध्ये महाराष्ट्रातील खासदार राजीव सातव आणि हर्षवर्धन सपकाळ यांची वर्णी लागली होती. जिल्हा परिषदेचे सदस्य, अध्यक्ष, आमदार, अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव ते पक्षाचे अखिल भारतीय पंचायतराज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष पदापर्यंत त्यांनी काम केले आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या ‘गुड बुक’ मध्ये सपकाळ असल्याचे मानले जाते.
अखिल भारतीय काँग्रेस समितीने एक पत्रक जारी केले असून, त्यामध्ये म्हटले आहे की, “काँग्रेस अध्यक्षांनी हर्षवर्धन सपकाळ यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदी तत्काळ प्रभावाने नियुक्ती केली आहे. मावळते अध्यक्ष नाना पटोले यांच्या योगदानाचे पक्ष कौतुक करतो. याचबरोबर काँग्रेस अध्यक्षांनी महाराष्ट्रातील काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून विजय नामदेवराव वडेट्टीवार यांची नियुक्ती तत्काळ प्रभावाने करण्यास मान्यता दिली आहे.”
अखेरच्या क्षणी नावावर शिक्कामोर्तब
विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभवानंतर नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर नवा प्रदेशाध्यक्ष कोण? याबाबत काँग्रेस वर्तुळात मोठी चर्चा सुरू होती. यामध्ये बंटी उर्फ सतेज पाटील, विश्वजीत कदम आणि विजय वडेट्टीवार यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, अखेरच्या क्षणी विदर्भातील चर्चेत नसलेले पण पक्षनिष्ठा आणि राहुल गांधी यांच्याशी थेट संपर्क असलेले हर्षवर्धन सपकाळ यांचे नाव पुढे आले. त्यांच्या नावावर एकमत झाल्यानंतर आज सपकाळ यांची नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून घोषणा करण्यात आली.
हर्षवर्धन यांचे गांधी कुटुंबाशी जवळचे संबंध
हर्षवर्धन पाटील यांचे गांधी कुटुंबीयांशी जवळचे संबंध असून, ते २०१४ ते २०१९ या कालावधीत बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. त्यांनी बुलढाणा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. याचबरोबर गेल्या काही काळात त्यांनी पक्षासाठी राष्ट्रीय स्तरावरही काम केले असून, अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी पक्षासाठी विविध भूमिका पार पाडल्या आहेत.