धैर्यशील मानेंना भाजपचा विरोध; हातकणंगलेत होणार कोंडी, ठाकरेंच्या रणनीतीवर लक्ष

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी पक्षाचे शेतकरी नेते राजू शेट्टी यांचे वर्चस्व आहे. परंतु २०१९ च्या निवडणुकीत त्यांचा धैर्यशील माने या युवा नेत्याने पराभव केला होता. आता पुन्हा या दोघांमध्येच लढत रंगणार आहे. त्यासाठी राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याची मागणी केली आहे.
धैर्यशील मानेंना भाजपचा विरोध; हातकणंगलेत होणार कोंडी, ठाकरेंच्या रणनीतीवर लक्ष

विशेष प्रतिनिधी/ मुंबई

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांना पुन्हा मैदानात उतरविले आहे. खरे तर अगोदर त्यांच्याविषयी नाराजी असल्याचे कारण पुढे करीत भाजपने उमेदवारीला विरोध केला होता. परंतु मुख्यमंत्री शिंदे यांनी कोल्हापूर आणि हातकणंगलेत विद्यमान खासदारांनाच उमेदवारी जाहीर केली. यामुळे हातकणंगलेत माने यांच्याविरोधात नाराजी वाढत चालली आहे. विशेषत: भाजप नेत्यांनी त्यांना विरोध केला आहे. या अगोदर आवाडे गटाने त्यांना विरोध केला होता. आता भाजप नेते संजय पाटील यांनीही आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढू शकतात. येथे शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी मानेंविरोधात शड्डू ठोकला आहे. यात ठाकरे गट काय भूमिका घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी पक्षाचे शेतकरी नेते राजू शेट्टी यांचे वर्चस्व आहे. परंतु २०१९ च्या निवडणुकीत त्यांचा धैर्यशील माने या युवा नेत्याने पराभव केला होता. आता पुन्हा या दोघांमध्येच लढत रंगणार आहे. त्यासाठी राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याची मागणी केली आहे. महाविकास आघाडीत ही जागा शिवसेना ठाकरे गटाला सुटलेली आहे. त्यांनी राजू शेट्टी यांना महाविकास आघाडीतून लढण्याची ऑफर दिली होती. परंतु त्यांनी नकार दर्शविला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार, हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. त्यामुळे या मतदारसंघात दुरंगी लढत होते की, तिरंगी, हे लवकरच स्पष्ट होईल. दरम्यान, धैर्यशील माने यांना महायुतीतूनच विरोध होऊ लागला आहे. या जागेसाठी भाजपने आग्रह धरला होता. परंतु शिंदे गटाने धैर्यशील मानेंसाठी आग्रही भूमिका घेतली आणि त्यांनाच उमेदवारी दिली. भाजपच्या नेत्यांनी या जागेसाठी आग्रह धरला होता. यामध्ये आवाडे गटाने जोर लावला होता. तसेच येथे विनय कोरे यांच्या नावाचीही चर्चा सुरू होती.

आवाडे गट आक्रमक

धैर्यशील माने यांना उमेदवारी दिल्याने भाजपचा आवाडे गट आक्रमक झाला आहे. त्यामुळे इचलकरंजी दौऱ्यावर असलेल्या माने यांना त्याची प्रचिती आली. विशेष म्हणजे तेथील भाजप कार्यालयात त्यांना रोषाचा सामना करावा लागला. त्यातच आता मतदारसंघातील आणखी एक भाजप नेते संजय पाटील यांनीही धैर्यशील माने यांच्या खासदारकीला विरोध केला आहे. यावरून आवाडे गट बंडखोरीच्या तयारीत असल्याचेही बोलले जात आहे. यात उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in