
पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील भिगवण जवळील मदनवाडी परिसरात एका महिलेचा अर्धवट जळालेल्या मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरात मृत महिलेल्या प्रियकराला अटक केली आहे. यावेळी पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपीने हत्येची कबुली दिली. काळू उर्फ दादा श्रीरंग पवार असं या 40 वर्षीय प्रियकराचं नाव आहे. घटना उघडकीस आल्यानंतर अवघ्या काही तासातच पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवत आरोपीला गजाआड केलं.
पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत अर्धवट जळालेला मृतदेह ताब्यात घेतला. यानंतर आरोपीची कसून चौकशी केल्यावर त्याने महिलेची गळा दाबून हत्या केल्याची कबूली दिली. यानंतर तिचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. पण तो अर्धवटच जळाला.
आरोपी आणि मृत महिला यांच्या अनैतिक प्रेमसंबध होते. मृत महिला ही प्रियकरापेक्षा 7 वर्षांनी मोठी होती. तसंच तिला एक मुलगा देखील होता. दोघांमध्ये पैशाचे व्यवहार देखील झाले होते. मृत महिला आरोपीकडे दिलेले पैसे परत मागत होती. तसंच माझा आणि माझ्या मुलाचा सांभाळ कर अशी देखील मागणी करत होती. आरोपी प्रियकर मात्र मुलाची जबादारी घेण्यास तयार नव्हता. यावरु त्यांच्यात वाद होत होते.
मृत महिला वारंवार पैशाचा आणि मुलाचा सांभाळ करण्याचा तगादा लावत असल्याने आरोपीने महिलेची गळा दाबून हत्या केली. यानंतर मृतदेह जाळून विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, मृतदेह हा पुर्णपणे जळाला नाही. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवून आरोपीला बेड्या ठोकल्या.