काही दिवसांपूर्वी एका रॅपरने सेल्फ मेड रॅप पोस्ट करून सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर तो रॅप व्हायरल झाला. मात्र त्याच्या पोस्टनंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी त्याला सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी सहकार्य न केल्याने आता त्यांच्या भावाने राजकीय नेत्यांच्या मदतीने माझ्या भावाचा पत्ता लागत नसल्याचे भावनिक वक्तव्य केले आहे. पोलिसांना विचारल्यास ते फक्त तुरुंगात आहे असे सांगतात, मात्र कोणत्या तुरुंगात आहे हे सांगायला कोणी तयार नाही. मुंबईला विचारल्यास संभाजीनगरला आहे सांगत आहेत तर, संभाजीनगर पोलीस तो मुंबईला असल्याचे सांगत आहेत.
संभाजीनगर येथील राज मुंगसे या तरुणाने काही दिवसांपूर्वी रॅप केला होता. त्या रॅपमध्ये राजकीय टिप्पणी केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. त्या प्रकरणी त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. आता राजकारण तापले असून राज मुंगसे यांच्या कुटुंबीयांनी थेट आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याशी संपर्क साधून राज मुंगसे बेपत्ता असल्याचे सांगितले. त्यामुळेच आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून सरकारने त्यांना लवकरात लवकर शोधून त्यांच्याबद्दलची माहिती राज मुंगसे यांच्या कुटुंबीयांना द्यावी, अशी मागणी केली आहे.