

गिरीश चित्रे / मुंबई
राज्यातील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचा आरोग्य विषयी डेटा एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. यामुळे रुग्णाला कोणता आजार होता, कोणत्या प्रकारची औषधे सुरू आहेत ही माहिती डॉक्टरांना मिळणार आहे. यासाठी आयुष्मान भारत खाती तयार करण्यात येत आहेत. ३१ जानेवारी २०२५ पर्यंत तब्बल ५ कोटी ७२ लाख ४१ हजार ३४२ आयुष्मान भारत खाती तयार करण्यात आल्याचे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
मोफत व दर्जेदार आरोग्य सुविधा यामुळे देशभरातील रुग्ण राज्य सरकारच्या विविध रुग्णालयांत उपचारासाठी मोठ्या विश्वासाने दाखल होतात. सरकारी रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासह त्यांना ठणठणीत बरे करून घरी पाठवण्यासाठी रुग्णालय प्रशासन दिवसरात्र झटत असते. त्यात आता देशभरात आयुष्मान भारत डिजिटल मिशन योजना सुरू केल्यानंतर आरोग्य क्षेत्रात डिजिटल इको सिस्टम तयार करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यामुळे आरोग्य क्षेत्रात एक नवीन क्रांती होणार असून सर्व रुग्णालये, दवाखाने आणि प्रयोगशाळा डिजिटल होणार आहेत. तसेच डॉक्टरांना एका क्लिकवर रुग्णांच्या सर्व जुन्या आरोग्य नोंदी पाहता येणार आहेत. महाराष्ट्रामध्ये ३१ जानेवारी २०२५ पर्यंत ५,७२,४१,३४२ आयुष्मान भारत आरोग्य खाती तयार करण्यात आली आहेत आणि ४९,७१३ डॉक्टर आणि परिचारिका आणि २५,३७३ आरोग्य सुविधा एबीडीएममध्ये नोंदणीकृत झाल्या आहेत, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
एबीडीएम अंतर्गत, नागरिक त्यांचा आभा (आयुष्मान भारत आरोग्य खाते) क्रमांक तयार करू शकतात आणि त्याचा वापर करून त्यांच्या डिजिटल आरोग्य नोंदी जोडून सुरक्षितपणे साठवू शकतात. यामुळे विविध आरोग्य सेवा प्रदान करणारे डॉक्टर व परिचारिका यांना तपशीलवार आरोग्य नोंदी तयार करणे शक्य होईल आणि वैद्यकीय तथा निदान आणि उपचाराविषयी निर्णय घेणे अधिक सोयीचे होणार आहे. या अभियानांतर्गत टेलिमेडीसिन सारख्या तंत्रज्ञानाच्या वापराला प्रोत्साहन देऊन आणि आरोग्य सेवांची राष्ट्रीय विकल्प चयन (पोर्टेबिलिटी) सक्षम करून दर्जेदार आरोग्य सेवेची उपलब्धता होईल. तसेच मोबाईलवर जवळचे हॉस्पिटल, डॉक्टर, लॅब आणि फार्मसी शोधणे शक्य होणार आहे.
या राज्यात प्रयोग यशस्वी
लडाख, चंदीगड, दादरा आणि नगर हवेली, दमण, दीव, पुद्दुचेरी, अंदमान, निकोबार बेटे, लक्षद्वीप या प्रदेशांमध्ये नॅशनल अथॉरिटी ऑफ हेल्थ (एन.एच.ए) ने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचे यशस्वी प्रात्यक्षिकाने एबीडीएम पायलट प्रकल्प पूर्ण झाला आहे. एबीडीएम सार्वजनिक आरोग्य उपायांबाबत आधारित निर्णय घेण्यास मदतपूर्ण उपक्रम आहे.