राज्यातील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग सतर्क ; नियमावली जाहीर करत नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन
राज्यात एकीकडे थंडीची चाहूल वाढत चालली आहे. मात्र, दुसरीकडे वाढणाऱ्या गारव्यासह हवेची गुणवत्ता देखील खालवत चालली आहे. राज्यात वायू प्रदूषणात वाढ होत आहे. मागील काही दिवसात वायू प्रदूषणात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. मुंबईसह अनेक राज्यात वायू प्रदूषण वाढल्यानं आरोग्यावर विपरीत परिणाम होताना दिसत आहे. राज्यातील 17 मुख्य शहरांमध्ये प्रदूषणामुळे पसरणाऱ्या आजारांचा धोका अधिक वाढला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
राज्यातील मुख्य शहरांमध्ये प्रदूषणामुळे पसरणाऱ्या आजारांचा धोका वाढताना दिसत आहे. हवेची गुणवत्ता खालावल्यानं त्याचा थेट परिणाम आरोग्यावर होत आहे. धूलिकण वाढल्याने आरोग्य विभागाकडून मास्क वापरण्याचं आवाहन केलं आहे. राज्य सरकारने नागरिकांना खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे.
राज्य सरकारने जारी केलेल्या सूचना
मास्क वापरण्याला प्राधान्य द्या.
मॉर्निंग वॉक आणि संध्याकाळी घराबाहेर चालणं टाळा.
सकाळी आणि संध्याकाळी घराचे दरवाजे खिडक्या बंद ठेवा.
दुपारी 12 ते 4 बाहेर पडण्याचा सल्ला
लाकूड, कोळसा, आणि अन्य ज्वलनशील गोष्टी जाळणं टाळा.
दिवाळीत फटाके फोडणं टाळा
राज्यातील काही शहरातील हवेची गुणवत्ता पातळी खालावली आहे. राज्यातील काही शहरांमधील हवेची गुणवत्ता पातळी मध्यम ते वाईट श्रेणीत आहे. मुंबईपेक्षाही उपनगरांमधील हवा गुणवत्ता पातळी वाईट श्रेणीत आहे. मुंबई आणि उपनगरातील शहरांमध्ये पीएम 10 ची मात्रा अधिक आहे, यासाठी रस्त्यांवर धूळ, सुरु असणारे बांधकाम, औद्योगिक उत्सर्जन, वाहनांद्वारे होणारे प्रदूषण जबाबदार आहे.
खाली दिलेल्या शहरांसाठी आरोग्य विभागाची नियमावली लागू
मुंबई
नाशिक
अमरावती
सांगली
सोलापूर
जळगाव
जालना
कोल्हापूर
लातूर
अकोला
बदलापूर
उल्हासनगर
औरंगाबाद
पुणे
नागपूर
चंद्रपूर
नवी मुंबई