अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे ‘घड्याळ’ गोठवले जाणार? चिन्हाबाबत शरद पवार गटाच्या याचिकेवर उद्या सुनावणी

राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला देण्यात आलेले ‘घड्याळ’ हे चिन्ह गोठवून त्या जागी दुसरे चिन्ह देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने एका याचिकेद्वारे केली असून त्यावर २४ ऑक्टोबरला सुनावणी घेऊ, असे मंगळवारी सुप्रीम कोर्टाने सांगितले.
अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे ‘घड्याळ’ गोठवले जाणार? चिन्हाबाबत शरद पवार गटाच्या याचिकेवर उद्या सुनावणी
Published on

नवी दिल्ली : राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला देण्यात आलेले ‘घड्याळ’ हे चिन्ह गोठवून त्या जागी दुसरे चिन्ह देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने एका याचिकेद्वारे केली असून त्यावर २४ ऑक्टोबरला सुनावणी घेऊ, असे मंगळवारी सुप्रीम कोर्टाने सांगितले. पक्षाच्या दोन्ही गटांना चिन्हाच्या वापरापासून रोखण्याच्या मागणीसाठी ही याचिका करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका जाहीर होण्याआधीच आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल न्यायालयाने द्यावा, अशी मागणी उद्धव ठाकरे तथा शरद पवार गटाच्या वतीने करण्यात आली होती. मात्र, आता आचारसंहिता लागल्यामुळे चिन्हाबाबत शरद पवार गट अधिक आक्रमक झाला असून, याप्रकरणी निवडणुकीपूर्वी निर्णय द्यावा, अशी मागणी शरद पवार गटाने केली आहे.

न्यायमूर्ती सूर्यकांत व न्यायमूर्ती उज्जल भुयान यांच्या खंडपीठासमोर याबाबतची याचिका तातडीच्या ‘लिस्टींग’साठी नोंदण्यात आली. शरद पवार गटाच्या वकिलांनी याबाबत तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली. यावर खंडपीठाने याप्रकरणी तपशीलवार आदेश यापूर्वी देण्यात आल्याचे सांगितले. मात्र, अजित पवार गट या आदेशांचे पालन करीत नाही, असे शरद पवार गटाच्या वकिलांनी सांगितले. त्यावर खंडपीठाने आपण २४ ऑक्टोबरला याप्रकरणी सुनावणी घेऊ, असे स्पष्ट केले. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी २९ ऑक्टाेबर ही अखेरची तारीख आहे. त्यापूर्वी निर्णय घेण्याची विनंती शरद पवार गटाने केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in