राष्ट्रवादीच्या पक्षफुटीवर २३ जुलैला सुनावणी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधील आमदार अपात्रतेचे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे.
राष्ट्रवादीच्या पक्षफुटीवर २३ जुलैला सुनावणी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधील आमदार अपात्रतेचे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. याप्रकरणी २३ जुलैला सुनावणी होणार असल्याचे शरद पवार गटातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी 'एक्स'वर टाकलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. गेल्यावर्षी जुलै महिन्यात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाविरोधात बंड केले व पक्षातील ४१ आमदारांना सोबत घेत ते शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. तसेच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पावलावर पाऊल टाकत मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरच दावा केला. त्यानंतर हे प्रकरण निवडणूक न आयोगाकडे गेले.

निवडणूक आयोगाने शिंदेंप्रमाणेच अजित पवारांच्या गटाला मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मान्यता बहाल केली. तसेच पक्षाचे घड्याळ हे निवडणूक चिन्हदेखील अजित पवार गटाला देऊन टाकले. त्यामुळे शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून सोमवारी त्यावर सुनावणी पार पडली.

आव्हाड यांनी याबाबत 'एक्स'वर टाकलेल्या पोस्टमध्ये माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले • आहे की, अजित पवार गटाच्या आमदारांना अपात्र करण्यासंदर्भातील आमची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल असून, सोमवारी आमच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर आपले म्हणणे मांडले.

गद्दारीविरुद्ध आमचा लढा- आव्हाड

सरन्यायाधीशांनी आमची बाजू ऐकल्यानंतर याप्रकरणी २३ तारखेला सुनावणी लावून घ्यावी, मी स्वतः हे प्रकरण ऐकणार आहे, असे सांगितले. महाराष्ट्रातील गद्दारी लोकांसमोर आली पाहिजे अन् त्यावर काहीतरी कारवाई व्हावी यासाठी आमचा लढा चालू आहे, असे आव्हाड यांनी नमूद केले.

logo
marathi.freepressjournal.in