शिंदे गटाच्या याचिकेवर १५ फेब्रुवारीला सुनावणी

खरी शिवसेना ही शिंदे गटाची असल्याचा निर्वाळा देताना शिवसेना ठाकरे गटाच्या १४ आमदारांना पात्र ठरविण्याच्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे.
शिंदे गटाच्या याचिकेवर १५ फेब्रुवारीला सुनावणी

मुंबई : खरी शिवसेना ही शिंदे गटाची असल्याचा निर्वाळा देताना शिवसेना ठाकरे गटाच्या १४ आमदारांना पात्र ठरविण्याच्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी दाखल केलेल्या या याचिकेवर न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती फिरदोश पुनीवाला यांच्या खंडपीठाने १५ फेब्रुवारीला सुनावणी निश्चित केली आहे.

शिवसेना पक्ष कोणाचा, यासह ठाकरे व शिंदे गटाच्या आमदारांच्या पात्रता-अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निर्णय देताना शिवसेनेवर शिंदे गटाने केलेला दावा योग्य ठरविला. तसेच शिंदे आणि ठाकरे गटाचे सर्व आमदार पात्र असल्याचाही निर्वाळा दिला. अध्यक्षांच्या या निर्णयावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करत शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेच्या मागील सुनावणीवेळी दखल घेऊन खंडपीठाने शिवसेना ठाकरे गटाच्या १४ आमदारांसह विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना नोटीस बजावत ८ फेब्रुवारीपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.

मात्र गुरुवारी वेळेअभावी या याचिकेवर सुनावणी होऊ शकली नसल्याने शुक्रवारी अ‍ॅड. अनिल सिंग यांनी ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून देत तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली. न्यायालयाने याचिकेची सुनावणी १५ फेब्रुवारीला निश्चित केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in