
देवश्री भुजबळ/मुंबई
मुंबईसह आजूबाजूच्या जिल्ह्यांत आणखी काही दिवस उकाड्यातून सुटका मिळण्याची चिन्हे नाहीत. भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) ६ एप्रिलच्या हवामान अहवालानुसार, पुढील ४८ तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये किमान आणि कमाल तापमान अनुक्रमे २४ डिग्री सेल्सियस आणि ३६ डिग्री सेल्सियस राहणार आहे.
भारतीय हवामान विभागाच्या अहवालानुसार, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी या कोकण पट्ट्यात उष्णतेचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात मुंबईसह आसपासच्या जिल्हांतील नागरिकांना उकाड्याने हैराण केले. त्यात अवकाळीनेही हजेरी लावली. त्यामुळे तापमानाचा पारा वाढला होता.
रविवारी, मुंबईतील सांताक्रूझ वेधशाळेने किमान तापमान २४ डिग्री आणि कमाल तापमान ३३.८ डिग्री सेल्सियसची नोंद केली. सोमवारी तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच १० एप्रिलपासून, आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे तापमानाचा पारा थोडासा कमी होईल, असे भारतीय हवामान विभागाच्या मुंबई अधिकारी सुषमा नायर यांनी सांगितले.
अवकाळीची शक्यता
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, एप्रिल २०२५ साठी महाराष्ट्रातील किमान आणि कमाल तापमान सामान्यापेक्षा जास्त राहील. दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये सामान्य ते जास्त अवकाळीची शक्यता आहे. उत्तर कोकण आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्येही अवकाळी अपेक्षित आहे, असे अहवालात म्हटले आहे.