आज राज्यातील 'या' भागात उष्णतेची लाट; विदर्भ, मराठवाड्यात पावसाची शक्यता

मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये एक किंवा दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका पाऊस आणि सोसाट्याचा वारा ३०-४० किमी प्रतितास वेगाने वाहण्याची शक्यता आहे.
आज राज्यातील 'या' भागात उष्णतेची लाट;  विदर्भ, मराठवाड्यात पावसाची शक्यता

मुंबई : आज मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग, कोकण आणि गोव्यात उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट भारतीय हवामान विभागाने दिला आहे. तर, दुसरीकडे राज्यातील मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा या ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसणार आहेत. येत्या ४८ तासांत राज्यात उष्णतेच्या लाटेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये एक किंवा दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका पाऊस आणि सोसाट्याचा वारा ३०-४० किमी प्रतितास वेगाने वाहण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा धोका असून शेतीपिकांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रविवारी पुण्यात कमाल तापमान ४० पार गेले होते. येथे ४१.५ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.

'या' भागात असणार उष्णतेची लाट

कोकणात पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटचा अंदाज वर्तवला आहे. तसेच मुंबई, ठाणे, पालघर या भागात तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुण्यात आज आणि उद्या आकाश निरभ्र राहणार आहे. पण, दुपारी आकाश ढगाळ राहण्याची शक्यात वर्तवली जात आहे.

हवामानातील बदलाचे 'हे' आहे कारण

महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यात वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे हवामानात बदल होत आहे. तर, देशातील अनेक राज्यात या आठवड्यात पाऊस पडण्याची शक्यात आहे. यात राज्यातील मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

logo
marathi.freepressjournal.in