

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संगोबा गावातील शेतीला मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होऊन शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले आहे. तरी तातडीने पंचनामे करून (सरसकट) अहवाल सादर करा, असे निर्देश गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्थानिक प्रशासनाला दिले. दरम्यान, अहवाल सादर झाल्यावर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लवकरात लवकर देणे शक्य होईल, असेही ते म्हणाले.
ग्रामस्थांच्या या मागणीची तात्काळ दखल घेत, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सोमवारी संगोबा गावाला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणी दरम्यान कदम यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या तसेच उपस्थित अधिकाऱ्यांकडून नुकसानग्रस्त क्षेत्राची सविस्तर माहिती घेतली.
यावेळी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी प्रशासनाला स्पष्ट सूचना दिल्या की, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा पंचनामा वेगाने पूर्ण करून शासनाकडे अहवाल सादर करावा, जेणेकरून शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळू शकेल. तसेच संभाव्य पूरस्थितीचा धोका लक्षात घेऊन बचावकार्य, आरोग्यसेवा व तात्पुरत्या निवाऱ्याच्या सुविधा यासाठी स्वतंत्र यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश दिले.
पूरस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता
ग्रामस्थ व स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, पावसाचे प्रमाण वाढल्यास आगामी काळात पूरस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने आवश्यक ती उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले. तसेच लोकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये यासाठी ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याचे आदेश तात्काळ देण्यात आले.
मुंबई : धाराशिव जिल्ह्यात परंडा तालुक्यातील साकत येथे मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. गावामध्ये पाणी शिरले आहे. पूर परिस्थितीमुळे साकत गावाचा संपर्क तुटला असून तिथे १२ नागरिक अडकले आहेत. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळी धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांना दूरध्वनी वरुन साकत गावात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे निर्देश दिले आहेत.
साकत गावातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी एनडीआरएफचे पथक पाठवावे तसेच हेलिकॉप्टरचीही व्यवस्था करावी, अशा सूचनाही उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. पूरस्थितीमुळे धोक्यातील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करावे, बचाव व मदत करण्यासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या पथकांना सज्ज ठेवावे, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. संकट काळात राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे, नुकसान झालेल्या नागरिकांसोबत आहे, असे ते म्हणाले.