पुण्यात पावसाने दाणादाण, मदतीसाठी लष्कराला पाचारण

पुण्यात पावसाने दाणादाण, मदतीसाठी लष्कराला पाचारण

कोणतीही पूर्वकल्पना न देता धरणातून पाणी सोडल्यामुळे ही परिस्थिती उद्भवल्याची तक्रार अनेक नागरिकांनी केली.
Published on

पुणे : पुणे जिल्हा आणि शहराला बुधवारी रात्रीपासून सुरू असलेल्या धुवांधार पावसाने अक्षरश: झोडपले. बुधवारी रात्री सुरू झालेला मुसळधार पाऊस गुरुवारीही कोसळत होता. त्यामुळे पुण्यातील रस्त्यांना नदीचे स्वरूप आले. दरम्यान, पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चार साखळी धरणांच्या क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीने खडकवासला धरण बुधवारी भरले. त्यामुळे धरणातून मुठा नदीत सातत्याने पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने मुठा नदीच्या पाण्याची पातळी बुधवारी रात्री एकदम वाढली. त्यामुळे सिंहगड परिसरातील नदीकाठच्या अनेक सोसायट्या जलमय झाल्या. पुण्यातील अनेक भागांत अक्षरश: छातीपर्यंत पाणी भरले होते. पाण्याच्या प्रवाहात विद्युत प्रवाह उतरून तीन जणांचा, तर ताम्हिणी घाटात दरड कोसळून एकाचा मृत्यू झाला. अनेक ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या. पुण्यात २४ तासांमध्ये २०० मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला. त्यामुळे मदतीसाठी लष्कराला पाचारण करण्यात आले.

पूर्वकल्पना न देता धरणातून पाणी सोडले:

दरम्यान, मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला. यामुळे मुठा नदी पात्रदेखील दुथडी भरून वाहत आहे. कोणतीही पूर्वकल्पना न देता धरणातून पाणी सोडल्यामुळे ही परिस्थिती उद्भवल्याची तक्रार अनेक नागरिकांनी केली. नाराज पुणेकरांनी प्रशासनावर जोरदार टीका केली. प्रशासनाने कोणतीही सूचना न देता पहाटे ४ च्या सुमारास मुळा-मुठा धरणाच्या जवळचे गेट उघडले. प्रशासनाने वेळीच सूचना केली असती तर लोकांना सुरक्षित स्थळी जाता आले असते, असे त्यांनी सांगितले.

विजेच्या धक्क्याने तिघांचा मृत्यू:

पुणे शहरातील डेक्कन जिमखाना भागातील पुलाची वाडी येथे मध्यरात्री विजेच्या धक्क्याने तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातात मृत्युमुखी पडलेले तीन जण एका अंडाभुर्जीच्या गाडीवर काम करत होते. अभिषेक अजय घाणेकर (२५), आकाश विनायक माने (२१, दोघेही रा. पुलाची वाडी डेक्कन) आणि नेपाळी कामगार शिवा जिदबहादूर परिहार (१८) अशी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत.

सतत कोसळणाऱ्या पावसामुळे पुणे जिल्ह्यातील अनेक भाग पाण्याखाली गेला आहे. अडकलेल्या नागरिकांना बोटीतून बाहेर काढण्यात आले. पावसामुळे शाळांना सुट्टी देण्यात आली. शहरातील अग्निशमन दल, पोलीस, एसडीआरएफ आणि एनडीआरएफसह अन्य एजन्सी वेगवेगळ्या भागात अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम करत होते. बचाव पथकाने घरात तसेच दुकानात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी बोटींचा आणि दोरींचा वापर केला. काही घरांमध्ये तर छतापर्यंत पाणी पोहोचले होते. एनडीआरएफने निबंज नगर, डेक्कन जिमखाना, सिंहगड रोड या भागात बचाव मोहीम केली. हा परिसर पावसामुळे सर्वात प्रभावित झाला होता.

जवळपास संपूर्ण शहरातील रस्त्यांवर पाणी साचल्याने पूरस्थिती निर्माण झाली. या पाण्यात अनेक दुचाकी तसेच चारचाकी वाहने अडकली होती. पुणेकर कंबरेपर्यंत, गळ्यापर्यंत आलेल्या पाण्यात शिरून स्वत:चे सामान वाचवण्याचा प्रयत्न करत होते. भिडे पूल, होळकर पूल, झेड ब्रिज आणि परिसरातील कॉलनी, गरवारे कॉलेजजवळचे खिल्लारे कॉम्प्लेक्स, पुणे महापालिकेच्या कार्यालयासमोरचा पूल यासारखे प्रमुख मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते.

पुणे शहर तसेच परिसरातील नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन बचाव पथक तसेच पोलिसांनी केले. खबरदारीचा उपाय म्हणून काही परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे पुणेकरांची अडचण आणखी वाढली. पुणे शहरात ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला असून सर्व टीम हाय अलर्टवर आहेत. पुरामुळे निर्माण झालेली परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिली.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे महानगरपालिका हद्दीत बालेवाडी पूल, मुळा नदी पूल, संगम रोड पूल, होळकर पूल, संगमवाडी पूल, महर्षी शिंदे पूल, हडपसर-मुंढवा रोड पूल, मातंग पूल, येरवडा शांतीनगर येथील पूल, निंबजनगर पूल, मोई व चिकली रस्त्यावरील इंद्रायणी पूल पावसामुळे पाण्याखाली गेले होते. मुसळधार पावसामुळे पुण्याची स्थिती अत्यंत विदारक झाली आहे. लोकांच्या घरात पाणी घुसून जनजीवन विस्कळीत झाले. घरातील जीवनोपयोगी वस्तू, खाटा, सिलिंडर पाण्यात वाहून गेले.

मुसळधार पावसामुळे सिंहगड रस्त्यावरील ५ सोसायट्यांमध्ये पाणी शिरले. एकता नगर परिसरातील द्वारका, जलपूजन, शारदा सरोवर, शाम सुंदर या सोसायट्या पाण्याखाली गेल्या आहेत. नागरिकांच्या घरात पाणी शिरले. त्यामुळे घरातील सर्व सामान पाण्याखाली गेले. नागरिकांना रेस्क्यू बोटीने सुखरूप घरातून बाहेर काढण्यात आले.

पुण्यात ३८ ठिकाणी झाडे पडली

पुणे शहर आणि परिसरात संततधारेमुळे ३८ ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. रात्रभर मुसळधार पाऊस झाल्यामुळे शहरातील वेगवेगळ्या भागात झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. या घटनांमुळे अग्निशमन दलाच्या जवानांची धावपळ उडाली. जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले.

नुकसानग्रस्त घरांच्या पंचनाम्याचे अजितदादांचे आदेश

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकता नगर येथे जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी तेथील स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. यावेळी अनेक नागरिकांनी त्यांच्यासमोर आपल्या तक्रारी मांडल्या. त्यानंतर अजित पवारांनी आता आयुक्तांना पंचनामे करायला सांगितले आहे.

पूरस्थिती नियंत्रणासाठी भारतीय लष्कराची मदत

पुण्यातील पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी स्थानिक प्रशासनाने लष्कराला पाचारण केले. त्यानंतर लष्कराच्या कृती दलाला प्रभावित भागाकडे तातडीने पाठवण्यात आले. एकूण ८५ जणांचा समावेश असलेल्या या पथकामध्ये लष्कराचे जवान, अभियांत्रिकी रेजिमेंट आणि लष्करी रुग्णालये तसेच इतर तज्ज्ञ घटकांतील वैद्यकीय पथके होती. गरज लागली तर मदतीसाठी भारतीय हवाई दलालादेखील सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे.

ताम्हिणी घाटात दरड कोसळून एकाचा मृत्यू

मुळशी तालुक्यातील ताम्हिणी घाटाजवळ दरड कोसळून एकाचा मृत्यू झाला. या घटनेत एक गंभीर जखमी असून शिवाजी बहिरट यांचा मृत्यू झाला आहे. जखमी झालेली व्यक्ती गोंदियाची रहिवासी आहे.

१४ जनावरे दगावली

खडकवासला धरणातूनही जवळजवळ ४० क्युसेक्सने मुठा नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. वारजे भागातील स्मशानभूमी परिसरातील नदीपात्रालगत गोठ्यात १४ जनावरे बांधली होती. पाण्याची पातळी वाढल्याने आणि गोठा नदीपात्रालगत असल्याने हा संपूर्ण गोठा पाण्याखाली गेला आणि या गोठ्यात बांधलेली १४ जनावरे पाण्यात बुडाल्याने दगावली. यात ११ गाई आहेत, तर चार ते पाच जनावरे पाण्यात तोंड वर करून उभी राहिल्याने बचावली.

logo
marathi.freepressjournal.in