सातारा जिल्हामध्ये पावसाचा जोर कायम आहे. महाबळेश्वरसह पश्चिम भागामध्ये सर्वाधिक पाऊस झालाय. कन्हेर पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढल्यामुळं पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. साताऱ्यातील संगम माहुली येथील स्मशानभूमीमध्ये पाणी शिरलंय. वेण्णा तसेच कृष्णा या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून या नद्यांकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. साताऱ्यामध्ये आज आणि उद्या मुसळधार पावसाचा अंदाज असून हवामान खात्याकडून रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे.
कोयना धरणाचे सहा दरवाजे उघडले-
गेल्या काही तासांमध्ये राज्यामध्ये पावसाची तुफान फटकेबाजी पाहायला मिळत आहे. राज्यातील काही भागामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे. सातारा जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरु असून येथील कोयना धरणामध्येही पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गुरूवारी संध्याकाळपर्यंत कोयना धरणात सुमारे ७८ टीएमसीवर साठा झाला होता. तीन दिवसांपूर्वी धरणाच्या पायथा वीजगृहाचे एक युनीट सुरू करून १ हजार ५० क्यूसेक विसर्ग सुरू करण्यात आला होता. परंतु सध्या सुरु असलेल्या पावसामुळे धरणातील पाण्याची आवक ८६ हजार क्यूसेकवर पोहोचली. त्यामुळे धरण व्यवस्थापनाने दरवाजातून विसर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गुरूवारी सायंकाळी पाच वाजता धरणाचे सर्व सहा दरवाजे दीड फुटांनी उचलून ११ हजार क्यूसेक विसर्ग सुरू करण्यात आला. तसेच रात्रीपर्यंत त्यामध्ये आणखी वाढ करुन २० हजार क्यूसेकपर्यंत नेण्यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आली.
राज्यातील पावसाच्या परिस्थितीवर मुख्यमंत्री लक्ष ठेवून...
गेल्या काही तासांपासून मुंबई, पुणे, ठाणे रायगड परिसरामध्ये अतिवृष्टी सुरू आहे. खासकरून पुण्यामध्ये परिस्थिती अधिक भीषण बनली असून मुठा नदीला पूर आल्यामुळं तिच्या काठावरील शेकडो घरांमध्ये पाणी घुसलं आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः या परिस्थितीकडे जातीने लक्ष ठेवून असून त्यांनी प्रशासनाला मदत व बचाव कार्य वेगानं राबवण्याच्या सूचना केल्या आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा, मनपा प्रशासन सज्ज असून संबंधित विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी हे घटनास्थळी पोहोचून मदतकार्य करत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं.