सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस; ३५ घरांची पडझड; गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

सातारा जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाची दाणादाण सुरू असून या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. साताऱ्यासह जिल्ह्यात विविध ठिकाणी ३५ घरांची पडझड झाली आहे. खटाव तालुक्यात १५० कोंबड्या मृत्युमुखी पडल्या आहेत. विविध ठिकाणी ६ जनावरांचा मृत्यू झाला असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस; ३५ घरांची पडझड; गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
Published on

कराड : सातारा जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाची दाणादाण सुरू असून या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. साताऱ्यासह जिल्ह्यात विविध ठिकाणी ३५ घरांची पडझड झाली आहे. खटाव तालुक्यात १५० कोंबड्या मृत्युमुखी पडल्या आहेत. विविध ठिकाणी ६ जनावरांचा मृत्यू झाला असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

सातारा शहरासह जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पावसाचे पाणी घरे, इमारतीचे तळमजले, दुकानामध्ये पाणी शिरल्याने लाखोंचे नुकसान झाले. शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. पावसामुळे घराची पडझड झाल्याने गोरगरींबाचे संसार उघड्यावर आले आहेत.

अवकाळी पावसामुळे सातारा तालुक्यात ११ , पाटण ३, कोरेगाव ६, वाई २, खंडाळा १, माण १, खटाव ११ असे मिळून ३५ घरांची पडझड झाली आहे.वाई तालुक्यात १, माणमध्ये २, खटावमध्ये २ व फलटणमध्ये १ असे मिळून ६ जनावरे मृत्युमुखी पडली आहेत तर खटाव तालुक्यामध्ये १५० कोंबड्याचा मृत्यू झाला आहे.

माण तालुक्यातील गंगोती विरकरवस्ती येथे वादळी वारे सुटल्याने अंगावर झाड पडून जर्सी गायीचा मृत्यू झाला. तसेच मार्डी. ता. माण येथे डाळिंब पिकांचे नुकसान झाले आहे. नवलेवाडी ता. खटाव येथे पावसाने घराचे व शेडचे नुकसान झाले.

४८ दुकानांत शिरले पाणी

साताऱ्याला लागूनच असलेल्या गोडोली येथे मान्सूनपूर्व पडलेल्या वळीव पण मुसळधार पावसाने अजिंक्यताऱ्यावरून वाहत येणाऱ्या ओढ्याला अचानक महापूर आल्याने अनेक घरात पाणी शिरले. यामुळे काही घरांच्या भिंती पडल्या तर पायरीप्लाझा येथील जवळपास ४८ दुकानात पाणी शिरल्याने व्यावसायिकांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले. या परिस्थितीला सातारा नगरपालिकेचा भोंगळ कारभार जबाबदार असक्याचा आरोप व्यावसायिकानी केला.नालेसफाई, बेकायदेशीर बांधकामांमुळे नैसर्गिक नाले,ओढे,वगळी नष्ट झाल्याने पाणी रहिवासी भागात घुसू लागले असल्याचा त्यांचा आरोप आहे.

ऑरेंज अलर्टचा इशारा

साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाला मान्सूनपूर्व आराखडे सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, त्यापूर्वीच अवकाळीने सातारा जिल्ह्याला असा तडाखा दिला आहे की, आराखडे सादर करायला वेळच मिळाला नाही. पुढील ७२ तास हवामान विभागाने सातारा जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्टचा इशारा दिला आहे. पुणे-बंगळुरू महामार्गावर जोरदार पावसामुळे महामार्गावर पाणी येऊन वाहतूक ठप्प होणे किंवा वाहने पाण्यात बुडून इंजिनचे नुकसान होणे, असे अनेक प्रकार घडले आहेत. सध्या येथील महामार्गाच्या सहा पदरीकरणाचे काम तसेच उड्डाणपुलाचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे. संततधार पावसामुळे वाहतूककोंडी झाली होती. वाहतूककोंडी सुरळीत करण्यासाठी पोलिसांना कसरत करावी लागली.

कृष्णा-वेण्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ

साताऱ्यातील संगम माहुली येथील कृष्णा-वेण्णा या नद्यांच्या संगमाजवळ पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. या पाण्यामुळे नदीपात्रात असलेली छत्रपती शाहू महाराज यांची समाधी निम्मी पाण्याखाली गेली असून, काशी विश्वेश्वर मंदिराच्या पायऱ्यांनाही पाणी टेकले आहे. कृष्णा व वेण्णा नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली असली तरीदेखील कैलास स्मशानभूमी येथील सर्व अग्निकुंड सुस्थितीत आहेत. दरम्यान, मे महिन्यातच प्रथमच संगम माहुली घाट जलमय झाल्याने पाणी पाहण्यासाठी घाटावर नागरिकांची तुफान गर्दी झाली होती.

महाबळेश्वरमध्ये ५५ मिमी पावसाची नोंद

सातारा जिल्ह्यामध्ये सलग पाचव्या दिवशी अवकाळी पावसाचा जोर कायम आहे. शुक्रवार दिवसभर जिल्ह्यामध्ये सर्व दूर पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनाची स्थिती निर्माण झाली आहे शेती पिकांचे व फळबागांचे नुकसान झाले आहे. गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी ३४ मिमी पावसाची नोंद झाली आहे तर जिल्ह्याचे नंदनवन समजले जाणाऱ्या महाबळेश्वर तालुक्यामध्ये ५५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

logo
marathi.freepressjournal.in