रत्नागिरी : कोकणात मुसळधार पाऊस पडत असून रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये अतिवृष्टी होईल, परिणामी नद्यांच्या पातळीत प्रचंड प्रमाणात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तेव्हा नदीकाठावरील वस्त्यांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी दक्षता घेण्याचा इशारा प्रशासनामार्फत देण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट जाहीर केला आहे.
चिपळूणच्या वनखात्याने नदी किनाऱ्यावरील लोकांना सुरक्षा व सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असून पाणी वाढत असल्याने मगरींचा संचार वाढून त्या वस्तीमध्ये शिरण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. मगरींपासून सुरक्षित राहण्यासाठी सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संगमेश्वर तालुक्याला पावसाने झोडपले आहे. धामणीमध्ये महामार्गावरील श्रद्धा हॉटेल व ग्रामपंचायतीमध्ये पाणी घुसले आहे. मागझन बाजारपेठेत पुराचे पाणी शिरले आहे. संगमेश्वर बाजारपेठेत पाण्यामुळे चिखलमय परिस्थिती झाली आहे. शास्त्री व सोनवी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. संगमेश्वर देवरुख मार्गावर बुरंबीनजीक सोनवी नदीच्या पुराचे पाणी रस्त्यावर आल्याने संगमेश्वर देवरुख मार्ग बंद झाला आहे. लांजा राजापूरमध्ये तुफानी पाऊस कोसळत असल्याने अनेक ठिकाणी मार्ग बंद झाले आहेत. राजापूरच्या जवाहर चौकात पुराचे पाणी भरले आहे. मुंबई-गोवा हम रस्ता पुराचे पाणी रस्त्यावर आल्याने धोकादायक स्थितीत आहे त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला असून रस्ता वाहतूक विस्कळीत झाली आहे. संततधार पाऊस पडत असल्याने राजापूरच्या अर्जुना नदीने इशारा पातळी गाठली आहे. चिपळूण, गुहागर, मंडणगड, दापोलीमध्ये सुद्धा पावसाने उच्छाद मांडला आहे.
कोकणात पडत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका कोकण रेल्वेवर सुद्धा झाला आहे. कोनात येणाऱ्या सर्व गाड्या विलंबाने येत असून अनेक ठिकाणी मार्गावर रखडल्या आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात रविवारी अतिवृष्टी झाली शनिवारी मध्य रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. ओरस येथील जिजामाता चौक येथे मुंबई-गोवा महामार्गावर दुपारनंतर वाहतूक ठप्प झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. परिणामी दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या अडीज तीन फुटापर्यंत पाणी आले, ठिकठिकाणी पाणी भरल्याच्या घटना घडल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील दोन नद्यांनी धोक्याच्या तर काही ठिकाणी इशारा पातळीच्या वर पाण्याची पातळी ओलांडली आहे. खेड जगबुडी नदीने तर राजापुरात कोदवली नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.
दापोली तालुक्यात पालगड येथे नदी पात्रात एक तरुण बुडाल्याचे वृत्त आहे.