कोकणात पावसाचे धुमशान

गेले काही दिवस मुंबईसह कोकणात मुक्काम ठोकून असलेल्या पावसाचा शनिवारी रात्रीपासून पुन्हा जोर वाढला. या मुसळधार पावसामुळे कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक भागांना फटका बसला.
कोकणात पावसाचे धुमशान
Published on

रत्नागिरी : गेले काही दिवस मुंबईसह कोकणात मुक्काम ठोकून असलेल्या पावसाचा शनिवारी रात्रीपासून पुन्हा जोर वाढला. या मुसळधार पावसामुळे कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक भागांना फटका बसला. कोकणातील नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, कोल्हापूर येथील २० बंधारे पाण्याखाली गेले असून राधानगरी धरणातून १३०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वीच पेडणे बोगद्यामध्ये पाणी साचल्याने कोकण रेल्वे ठप्प झाली होती. कोकण रेल्वेचे वेळापत्रक पार कोलमडले होते. तेव्हापासून अनेक रेल्वेगाड्या उशिराने धावत होत्या. त्यातच रविवारी दिवाण खवटी येथे मातीचा भराव कोसळल्याने पुन्हा एकदा कोकण रेल्वे ठप्प झाली आहे. रेल्वेमार्ग बंद पडल्याने अनेक स्थानकांत गाड्या थांबवण्यात आल्या. परिणामी, कोकण रेल्वे प्रवाशांना ताटकळत राहावे लागले. दरम्यान, बोरघर येथील मुंबई-गोवा महामार्गावरील पाणी कमी झाल्याने वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे.

जून महिन्यात ओढ दिलेल्या पावसाने अखेर उशिरा का होईना, दमदार हजेरी लावली. रविवारी ठाण्यात विक्रमी पावसाची नोंद करण्यात आली. सलग तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे यंदा पावसाने गतवर्षीच्या पावसाचा विक्रम मोडला आहे. आजपर्यंत १२६८.९५ मिमी पाऊस पडला, तर २०२३ मध्ये याच कालावधीत १००१.६० मिमी पावसाची नोंद झाली होती.

पोलादपूर तालुक्यातील सर्व नद्यांची पात्रे दुथडी भरून वाहू लागली असून शेतामध्ये लावणीला हा पाऊस अनुकूल असल्याने शेतकऱ्यांनी आवणं रोवण्यासाठी कंबर कसली असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. बदलापूरमध्ये गेल्या दोन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे उल्हास नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास उल्हास नदी धोक्याची पातळी गाठण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नागोठण्यात अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर काही क्षणातच पुराचे पाणी घरात शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. कर्जतमध्येही जोरदार पाऊस पडत असल्याने अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. भिवंडी शहरात शनिवारी रात्रीपासून कोसळधार असल्याने शहरातील सखल भागात पाणी साचले होते. यासह तालुक्यातील भिवंडी-पारोळ रोडवरील कांबे गावच्या हद्दीत मुख्य रस्त्यावर पाणी साचल्याने जुनांदुर्खी, कांबे, टेंभवली, पालीवली, गाणे, फिरिंगपाडा, लाखीवली, चिंबीपाडा, कुहे, आंबरराई, कुहे, खडकी, भुईशेत, माजिवडे, धामणे, वाण्याचा पाडा आदी ग्रामीण भागातील गावांचा भिवंडी शहराशी संपर्क तुटला होता.

रत्नागिरी जिल्ह्यात सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून पावसामुळे शहरात ठिकठिकाणी पाणी भरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. चिपळूणमध्येसुद्धा नागरिकांना स्थलांतरित करावे लागले असून खेड शहरातील स्थलांतरांची संख्या चिकुळात ४१, तळ्याचे वाकन परिसरात ८४ असे एकूण १२५ जणांना स्थलांतरित करण्यात आले आहे.

भातसा धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ

ठाण्यातील शहापूर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस पडत असून या पावसामुळे भातसा धरण पाणीपातळीत वेगाने वाढ होत आहे. आजमितीस ११९ मीटर इतकी पाणी पातळीत वाढ झाली असून १ जूनपासून १२०० मिमी इतक्या पावसाची आजपर्यंत नोंद झाली आहे. ती मागील वर्षीपेक्षा अधिक आहे. मागील वर्षी आजमितीस ८८० मिमी इतक्या पावसाची नोंद होती, तर ४१.३३ टक्के पाणीसाठा होता. यावर्षी तो ४५.७६ टक्के इतका आहे.

कोकण रेल्वे पुन्हा ठप्प

कोकण रेल्वेमार्गावर दिवाण खवटी येथील बोगद्यानजीक मातेचा भराव रेल्वे रुळावर आल्याने पूर्ववत झालेली कोकण रेल्वे पुन्हा ठप्प झाली आहे. त्यामुळे चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाले. या मार्गावरील वाहतूक पूर्ववत व्हायला तीन तास लागणार असल्याचे सांगण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in