मुंबई : गणेशोत्सवाला अवघे सहा दिवस राहिलेले असतानाच राज्याच्या विविध भागात पाऊस ‘कोसळत’ आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेष म्हणजे, मराठवाडा व विदर्भात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. दरम्यान, येत्या २४ तासात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा इशारा पुणे हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी दिला आहे.
येते चार ते पाच दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पावसाची तीव्रता ४ सप्टेंबरपासून कमी होण्याची शक्यता आहे, असे ते म्हणाले.
लातूर जिल्ह्यात २४ तासांपासून मुसळधार पावसामुळे ओढे आणि नद्यांना पूर आला आहे. शेतात पाणी घुसल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. लातूर जिल्ह्यातील उदगीर, अहमदपूर, रेणापूर, चाकुर, निलंगा भागात पिकांचे मोठे नुकसान झाले. नांदेड जिल्ह्यामध्ये सकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे. जिल्ह्यातील २६ महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे. त्याचबरोबर गोदावरी नदीसह इतर छोटे-मोठे नदी नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली होती. शेतात पाणी साचल्याने मूग, सोयाबीनसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
बीडमध्ये मुसळधार
बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात २४ तासांपासून पावसाची संततधार सुरु असल्याने नागापूर धरण ओव्हरफ्लो झाले आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. संततधार पावसामुळे परळी शहरासह १५ गावांना पाणी पुरवणारे नागापूर धरण ओसंडून वाहत आहे.
परभणीत पावसाचा जोर कायम आहे. हळूहळू पाणी आता सखल भागात असलेल्या नागरी वस्त्यात शिरत आहे. त्यामुळे नागरिकांना या ठिकाणी घरात जाण्यासाठी रस्ता राहिलेला नाही.
जळगावच्या मुक्ताईनगरमध्येही मुसळधार पाऊस पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर उष्णतेपासून हैरान झालेल्या नागरिकांनादेखील मोठा दिलासा मिळाला आहे
यवतमाळ जिल्ह्यातील पुसद या ठिकाणी ढगफुटीसदृश्य झालेल्या पावसाने वडसद या नाल्याला पूर आला आहे. पुरामुळे नाल्याने रौद्र रूप धारण केले होते. या पुरात या भागातील शेतीपिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
आंध्र, तेलंगणात पावसाचे थैमान
हैदराबाद : पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने आंध्र प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर सुरू असून गेल्या २४ तासांत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील पाच जणांचा मृत्यू विजयवाडा येथे भूस्खलनामुळे झाला आहे, तर तेलंगणातही जोरदार पाऊस कोसळत आहे.
आंध्रचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी नैसर्गिक आपत्तीत मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच भूस्खलनाचा धोका असलेल्या प्रदेशातील नागरिकांचे स्थलांतर करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. गेल्या २४ तासांत विजयवाडासह आंध्रच्या विविध भागात मुसळधार पाऊस पडत आहे.
तेलंगणात तिघांचा बळी, तिघेजण गेले वाहून
तेलंगणाच्या अनेक भागांना पावसाने झोडपले असून मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. तेलंगणातील मेहबुबाबाद व खम्माम जिल्ह्यात तिघांचा मृत्यू झाला असून तिघेजण वाहून गेले आहेत. राज्यात अनेक ठिकाणी रेल्वेमार्गात पाणी साचले आहे. तसेच अनेक ठिकाणी रेल्वेमार्ग वाहून गेला. ९९ रेल्वे गाड्या रद्द केल्या असून ५४ गाड्यांचे मार्ग बदलले आहेत. एनडीआरएफ व एसडीआरएफतर्फे बचाव व मदतकार्य सुरू आहे. हैदराबाद शहरातही जोरदार पाऊस सुरू असून ठिकठिकाणी पाणी साचले आहे. त्यामुळे राज्य सरकारने सोमवारी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी सर्व जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, महसूल, जलसिंचन व मनपा आयुक्तांना तातडीने घटनास्थळी जाण्याचे आदेश दिले.
गुजरातमध्ये पुरामुळे जीवन विस्कळीत
गुजरातमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून विविध भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. केंद्रीय गृह खात्याने गुजरातमध्ये पाऊस व पुरामुळे होणाऱ्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आंतर मंत्रालय गट स्थापन केला आहे. हे पथक लवकरच २५ ते ३० ऑगस्टदरम्यान मुसळधार पाऊस झालेल्या भागाचा दौरा करणार आहे. या आंतर मंत्रालयाच्या केंद्रीय टीमचे नेतृत्व राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेचे कार्यकारी संचालक करणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून गुजरातमध्ये पाऊस पडत असून अनेक शहरांत पूर आले आहेत. वीज गेल्याने अनेकांना अंधारात रहावे लागत आहे. आतापर्यंत राज्यात २८ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील ९३९ रस्ते पुरामुळे बंद आहेत.