ख्रिसमसमुळे द्रुतगती मार्गावर वाहतूककोंडी; लोणावळा, खंडाळ्यात पर्यटकांची गर्दी

नाताळ सण, तसेच नववर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटकांनी बुधवारी लोणावळा, खंडाळ्यात गर्दी केली.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

पुणे : नाताळ सण, तसेच नववर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटकांनी बुधवारी लोणावळा, खंडाळ्यात गर्दी केली. पहाटेपासून मुंबईतील पर्यटक लोणावळ्याकडे निघाल्याने द्रुतगती मार्गावर वाहतूककोंडी झाली. खंडाळा घाटातील वाहतूक विस्कळीत झाल्याने वाहनांच्या रांगा दहा ते बारा किलोमीटरपर्यंत लागल्या.

नाताळ, तसेच नववर्ष स्वागतासाठी दरवर्षी मुंबईसह राज्यातील वेगवेगळ्या भागातील पर्यटक लोणावळा, खंडाळा भागात दाखल होतात. बुधवारी सकाळपासून द्रुतगती मार्गावर मोठ्या संख्येने पर्यटकांची वाहने दाखल झाली. यामध्ये मुंबईकर पर्यटकांचा समावेश होता. खंडाळा घाटात वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे वाहतूक सुरळीत करण्यासाठी महामार्ग पोलिसांनी पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहने खंडाळा बोगद्याजवळ थांबविण्यात आली. मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या वाहनांसाठी सर्व सहा मार्गिका खुल्या करून दिल्याने वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली. मात्र, पर्यटक मोठ्या संख्येने मोटारी, खासगी वाहनातून दाखल झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

मुंबईकर पर्यटक नाताळ, नववर्ष साजरे करण्यासाठी लोणावळा, खंडाळ्यात येतात. लोणावळा, खंडाळ्यासह कोल्हापूर, महाबळेश्वर, पाचगणी, कोकणात पर्यटक मोठ्या संख्येने जातात. बहुतांश पर्यटक मोटारी आणि खासगी वाहनातून येतात. मोठ्या संख्येने वाहने द्रुतगती मार्गावर आल्याने वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. द्रुतगती मार्गावरील खंडाळा घाटातील अमृतानंजन पूल ते अंडा पॉईंट , खालापूर टोल नाका परिसरात वाहनांच्या रांगा लागल्या होतात. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी महामार्ग पोलिसांनी प्रयत्न केले.

मात्र, घाटक्षेत्रात वाहनांचे इंजिन

गरम होऊन वाहने बंद पडल्याने वाहतूक विस्कळीत झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. नाताळ ते नववर्ष दरम्यान मोठ्या संख्येने पर्यटक पर्यटनासाठी बाहेर पडतात. पर्यटकांनी वेळेचे नियोजन करून बाहेर पडावे. त्यामुळे कोंडीत अडकावे लागणार नाही. वाहनचालकांनी नियमांचे पालन केल्यास वाहतूक सुरळीत होईल, तसेच चुकीच्या पद्धतीने वाहने पुढे नेण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन महामार्ग पोलिसांनी केले आहे.

५ तासानंतर वाहतूक पूर्ववत

गेल्या काही दिवसांपासून पुणे-सातारा मार्गावर प्रचंड वाहतूककोंडी निर्माण होत आहे. अशातच घाटात दाट धुके पडत असल्याने वाहने देखील धीम्या गतीने सुरू आहेत. मार्गावर कोंडी निर्माण होऊ लागल्यामुळे वाहनधारकांना या कोंडीच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सुमारे ५ तासानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात पोलिसांना यश आले. मात्र या घाटातील वारंवार होत असलेल्या वाहतूककोंडीवर प्रशासनाने ठोस मार्ग काढण्याची मागणी वाहनधारकांनी केली आहे.

खंबाटकी घाटात वाहनांच्या रांगा

कराड येथून जात असलेल्या पुणे-सातारा-कोल्हापूर-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील पुणे ते सातारा दरम्यान सलेल्या खंबाटकी घाटात सध्या वारंवार वाहतूककोंडीची समस्या उद्भवली जाऊ लागली आहे.

एखादा अपघात, वाहन ब्रेकडाऊन होणे किंवा पार्किंग करून इतरत्र जाणे आदी कारणांमुळे महामार्गवरील एखादी मार्गिका बंद होऊन वाहतूककोंडी होत आहे. दरम्यान,आज बुधवारी ख्रिसमसमुळे सुट्टी व जोडून शनिवार-रविवारची सुट्टी यामुळे महामार्गावर वाहनांची मोठी गर्दी झाल्याचे पहावयास मिळाले. सकाळीही साताऱ्याकडे जाण्यासाठी निघालेल्या वाहनांमुळे खंबाटकी घाट पुन्हा एकदा जाम झाल्याची घटना घडली.

या वळणदार घाट मार्गावर सुमारे ४ ते ५ किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यामुळे मोठी वाहतूककोंडी निर्माण झाली होती. घाट मार्गात वाहने बंद पडल्यामुळे खंबाटकी घाट जाम झाल्याने वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागला.

logo
marathi.freepressjournal.in