हेलिकॉप्टर भरकटल्याने अजितदादांच्या पोटात गोळा आला, फडणवीसांनी धीर दिला; दादांनी कथन केला थरार

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना गडचिरोलीला घेऊन जाणारे हेलिकॉप्टर पावसाळी ढगांमुळे भरकटल्याची घटना बुधवारी घडली.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्रपीटीआय
Published on

गडचिरोली : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना गडचिरोलीला घेऊन जाणारे हेलिकॉप्टर पावसाळी ढगांमुळे भरकटल्याची घटना बुधवारी घडली. हेलिकॉप्टर भरकटल्याने अजित पवार यांच्या पोटात गोळा आला, पण देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना धीर देत सांगितले की, ‘घाबरू नका काहीही होणार नाही, माझे सहा वेळा अपघात झाले, पण कधी काही झाले नाही’. सुदैवाने आम्ही सुखरूप लँड झालो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हेलिकॉप्टर प्रवासात आलेला थरार कथन केला.

या प्रवासात त्यांच्यासोबत उद्योग मंत्री उदय सामंत आणि पार्थ पवार हेही हेलिकॉप्टरमध्ये होते. सर्वांच्याच चेहऱ्यावर काळजी दाटून आली होती, पण पांडुरंगाच्या कृपेने आम्ही सर्व सुखरुप खाली उतरल्याचे अजित पवार म्हणाले. गडचिरोली जिल्ह्यातील वडलापेठ येथील सुरजागड इस्पात प्रा. लि. या आयर्न स्पॉंज उत्पादन करणाऱ्या कारखान्याचा भूमिपूजन सोहळा बुधवारी झाला. या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी फडणवीस व अजिदादांनी एकत्र प्रवास केला.

पायलटने आपले कौशल्य पणाला लावले

खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर ढगांमध्ये भरकटले होते. दृष्यमानता अत्यंत कमी झाली होती. मात्र, पायलटने आपल्या अनुभवाच्या जोरावर हेलिकॉप्टर मोठ्या कौशल्याने जमिनीवर उतरवले. त्यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. काही काळ हेलिकॉप्टर भरकटल्याने आमचा जीव टांगणीला लागला होता. ‘विठ्ठल.. विठ्ठल..’ म्हणत मी देवाचा धावाच करत होतो, असे अजितदादांनी सांगितले.

फडणवीस निवांत

नागपुरातून उड्डाण केले तेव्हा बरे वाटत होते, मात्र गडचिरोलीजवळ आल्यानंतर हेलिकॉप्टर ढगात शिरले, अन‌् माझ्या पोटात गोळा आला. मी इकडे तिकडे पाहत होतो.. सर्व घाबरून होतो, मात्र देवेंद्र फडणवीस निवांत होते. त्यांना म्हणालो पाहा, आपण ढगात जात आहोत. तेव्हा फडणवीस म्हणाले, ‘घाबरु नका, माझे आजवर सहा अपघात झालेले आहेत, मात्र मला कधीही काही झाले नाही. मी हेलिकॉप्टरमध्ये असलो तर कधीही काही होत नाही आणि तसेच झाले. आम्ही सुखरूप उतरलो, असा किस्सा अजित पवारांनी सांगितल्यावर उपस्थितांमध्ये हशा पिकला.

logo
marathi.freepressjournal.in