हिंगोलीत हेमंत पाटील यांना विरोध; महायुतीत बेबनाव

हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला आमचा कडाडून विरोध आहे. दोन दिवसांत आम्ही आमच्या नेतृत्वाकडे आमच्या भावना कळवू आणि उमेदवार बदलण्याची मागणी करू. हिंगोली हा भाजपचा बालेकिल्ला आहे.
हिंगोलीत हेमंत पाटील यांना विरोध; महायुतीत बेबनाव

विशेष प्रतिनिधी/मुंबई

हिंगोली लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार आणि शिंदे गटाच्या शिवसेनेचे उमेदवार हेमंत पाटील यांना पुन्हा उमेदवारी दिल्याने महायुतीत वाद उफाळून आला असून, आता थेट त्यांच्या उमेदवारीलाच विरोध होत आहे. या अगोदर जिल्ह्यातील भाजपचे नेते माजी खासदार शिवाजी माने यांनी यावरून नाराजी व्यक्त केली होती. आता तर थेट स्थानिक कार्यकर्त्यांनीच विरोध केला आहे. रविवारी झालेल्या महायुतीच्या आढावा बैठकीत याची प्रचिती आली. या बैठकीत भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अक्षरश: गोंधळ घातला. त्यामुळे हेमंत पाटील यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

महायुतीत सर्व काही आलबेल असल्याचे सुरुवातीपासून दाखविण्यात येत आहे. मात्र, उमेदवार लादण्याच्या पद्धतीमुळे अंतर्गत धुसफूस खूप आहे. उमेदवारी जाहीर केल्यानंतर ती उफाळून येत आहे. त्याचीच प्रचिती आज हिंगोलीत आयोजित केलेल्या भाजपच्या आढावा बैठकीत आली. हेमंत पाटील यांना हिंगोली मतदारसंघातून पुन्हा उतरविण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात त्यांना उमेदवारी जाहीर करण्याअगोदरपासून विरोध होता. भाजप नेते, पदाधिकाऱ्यांनी त्याबाबत ठोस भूमिका मांडली होती. त्यामुळे हेमंत पाटील यांना उमेदवारी देताना महायुतीत फेरविचार केला गेला. परंतु, अखेर त्यांनाच उमेदवारी जाहीर केली गेली. त्याचा स्फोट आढावा बैठकीत झाला. भाजपचे पदाधिकारी उघडपणे त्यांच्या विरोधात मैदानात उतरले असून हेमंत पाटील यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

या मतदारसंघात भाजपचे ३ आमदार आहेत. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या तुलनेत येथे भाजपचे प्राबल्य असल्याचे भाजपच्या नेते, पदाधिकाऱ्यांचे म्हणणे होते. मात्र, महायुतीत ही जागा पुन्हा शिवसेना शिंदे गटालाच देण्यात आली. त्यामुळे भाजपचे नेते, पदाधिकारी नाराज आहेत. यासंदर्भात भाजपचे आमदार भीमराव केराम यांनी महायुतीत ही जागा शिवसेनेला देण्यात आल्याने नाराजी व्यक्त केली आहे. या मतदारसंघात भाजपचा उमेदवार द्यावा, अशी आमची मागणी आहे.

उमेदवारीचा फेरविचार करण्याची केली मागणी

हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला आमचा कडाडून विरोध आहे. दोन दिवसांत आम्ही आमच्या नेतृत्वाकडे आमच्या भावना कळवू आणि उमेदवार बदलण्याची मागणी करू. हिंगोली हा भाजपचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे आम्हालाच उमेदवारी मिळाली पाहिजे, यासाठी आम्ही आग्रह धरू, असे भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. महायुतीचे उमेदवार (शिंदे गट, शिवसेना) हेमंत पाटील यांच्या उमेदवारीवरून आता मतदारसंघात भाजपविरुद्ध शिवसेना असे वातावरण बनले आहे. याचा फटका महायुतीच्या उमेदवाराला बसू शकतो, असे बोलले जात आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in