

मुंबई : राज्याच्या सेवेत असलेल्या राजपत्रित अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात येणारी हिंदी भाषा निम्न श्रेणी व उच्च श्रेणी परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. ही परीक्षा २८ जून रोजी घेण्याचे भाषा संचालनालयाने ठरवले होते. या निर्णयाला मराठी अभ्यास केंद्राने आक्षेप घेत आंदोलनाचा इशारा दिला होता. याची दखल घेत संचालनालयाने हिंदी भाषा परीक्षेला स्थगिती दिली आहे. या निर्णयानंतरही हिंदी परीक्षा कायम रद्द करण्याची मागणी मराठी अभ्यास केंद्राने केली आहे.
मराठी भाषिक राज्यात हिंदीची परीक्षा मराठी भाषिक असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवाशर्तीचा भाग म्हणून घेण्याची आवश्यकता का आहे आणि इतर बिगर हिंदी राज्यांतही अशी हिंदीची सेवांतर्गत परीक्षा घेतली जाते का असे प्रश्न मराठी अभ्यास केंद्राने उपस्थित केले होते. राज्य शासनाने शासन निर्णय काढून प्रस्तावित हिंदी परीक्षा रद्द केल्याचे तत्काळ जाहीर करावे अशी मागणी केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार यांनी केली होती.
या निर्णयाच्या विरोधात राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्यावर आज मंत्री उदय सामंत यांनी हिंदी भाषा परीक्षेला स्थगिती देत असल्याचे जाहीर केले. मात्र परीक्षेला स्थगिती नको तर ही परीक्षा कायमची रद्द करावी या मागणीवर मराठी अभ्यास केंद्र ठाम असल्याचे डॉ. दीपक पवार यांनी म्हटले आहे. जोपर्यंत ही परीक्षा रद्द होत नाही तोपर्यंत या विषयातून माघार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.