

हिंगोली : ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (सीजेपी) संस्थापक अभिजीत दीपके यांच्या ‘स्कूल ठीक करो’ अभियानाचा मोठा दणका हिंगोली जिल्ह्यात पाहायला मिळाला आहे. भरदिवसा शाळेत दारू पिऊन झोपणाऱ्या लिंबाळा येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाला निलंबित करण्यात आले आहे.
दीपके यांनी दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर ते हिंगोलीत पोहोचण्यापूर्वीच प्रशासनाने ही कारवाई केली. मात्र, कारवाई होऊनही शाळेला ४ नवे शिक्षक मिळावेत, या मागणीसाठी दीपके यांनी शाळेतच ठिय्या आंदोलन सुरू केले.
हिंगोली जिल्ह्यातील लिंबाळा गावातील जिल्हा परिषद शाळेत विनोद कटके नावाचा मुख्याध्यापक भरदिवसा दारू पिऊन येत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला होता. दीपके यांनी या शाळेला भेट दिली असता, हा मुख्याध्यापक चक्क दारूची बाटली घेऊन शाळेच्या आवारात फिरताना आणि वर्गात लहान मुलांसमोरच दारूच्या नशेत झोपलेला असल्याचा संतापजनक व्हिडीओ समोर आला होता.
या गंभीर प्रकारानंतर दीपके यांनी प्रशासनाला धारेवर धरत, संबंधित शिक्षकावर तत्काळ कारवाई न झाल्यास मंगळवारी उपोषण आणि आंदोलन करण्याचा थेट इशारा दिला होता. आज ते येथे दाखल होण्यापूर्वीच हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी संबंधित मुख्याध्यापक विनोद कटके याच्या निलंबनाचे आदेश काढले.
दरम्यान, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी केवळ एका शिक्षकावर कारवाई करून भागणार नाही, तर या शाळेला तातडीने चार नवे आणि चांगले शिक्षक मिळायला हवेत या मागणीवर दीपके ठाम आहेत. जोपर्यंत शाळेला नवे शिक्षक मिळत नाहीत, तोपर्यंत आपण शाळेतून जाणार नाही, अशी रोखठोक भूमिका घेत त्यांनी तिथेच आंदोलन सुरू केले आहे.
शिक्षणाधिकाऱ्यांचे आश्वासन
या आंदोलनादरम्यान दीपके यांचे शिक्षणाधिकाऱ्यांशी फोनवरून बोलणे झाले असून, शिक्षणाधिकाऱ्यांनी ‘लेटरहेड’वर नव्या शिक्षकांच्या नियुक्तीबाबत लेखी आश्वासन देण्याचे कबूल केले आहे. सध्या अभिजीत दीपके लिंबाळा गावातील शाळेची सविस्तर पाहणी करत असून, जोपर्यंत प्रशासनाकडून लेखी स्वरूपात ठोस निर्णय येत नाही, तोपर्यंत त्यांचा हा शैक्षणिक लढा तिथेच सुरू राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नेत्यांच्या मुलांना खेड्यात पाठवा
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दररोज कित्येक किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. त्यांच्या हालअपेष्टा समजण्यासाठी नेते आणि मंत्र्यांनी आपल्या मुलांना कमीत कमी एक दिवस तरी ग्रामीण भागातील शाळांमध्ये पाठवले पाहिजे, असे मत अभिजीत दीपके यांनी व्यक्त केले. राजकीय पक्ष आणि नेते आपल्या चुनावी रॅलींसाठी बसेस आणि गाड्यांची सहज व्यवस्था करू शकतात, पण गरीब विद्यार्थ्यांच्या प्रवासासाठी साधी एक बस पुरवू शकत नाहीत, अशा शब्दांत त्यांनी सरकारवर ताशेरे ओढले.
अब्दुल हाफिज खरा देशभक्त, नायक
पश्चिम बंगालमधील पक्षाचा कार्यकर्ता शेख अब्दुल हाफिज हा खरा देशभक्त व या देशाचा नायक आहे, असे अभिजीत दीपके यांनी मंगळवारी सांगितले. अब्दुल हाफिजचा सीजेपीशी असलेल्या राजकीय संबंधांमुळे त्याच्या वडिलांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. शेख मोहम्मद मफिक यांचा शनिवारी रात्री बर्धमान येथील रुग्णालयात मृत्यू झाला. मात्र, पश्चिम बंगालमधील सत्ताधारी भाजपने या घटनेचा राजकीय संबंध असल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. हफीज दिल्लीच्या आंदोलनात होता व सध्या तो 'स्कूल ठीक करो' मोहिमेतही सहभागी आहे. वडिलांच्या मृत्यूनंतरही त्याने संघर्ष सुरूच ठेवण्याचा निर्धार केला आहे.