हिंजवडी आयटी पार्कचे वाटोळे; आयटी उद्योग बंगळुरू, हैदराबादला चालले; उपमुख्यमंत्री अजित पवारांचा संताप

मे महिन्यात झालेल्या तुफान पावसात पुण्यात हिंजवडी आयटी पार्कमध्ये पाणीच पाणी झाले होते. यामुळे या पार्कमधील गैरसोयींचा बभ्रा सर्वत्र झाल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तत्काळ हिंजवडी आयटी पार्कला भेट देऊन परिस्थिती सुधारण्याचे आश्वासन दिले.
हिंजवडी आयटी पार्कचे वाटोळे; आयटी उद्योग बंगळुरू, हैदराबादला चालले; उपमुख्यमंत्री अजित पवारांचा संताप
Photo : X (AjitPawarSpeaks)
Published on

पुणे : मे महिन्यात झालेल्या तुफान पावसात पुण्यात हिंजवडी आयटी पार्कमध्ये पाणीच पाणी झाले होते. यामुळे या पार्कमधील गैरसोयींचा बभ्रा सर्वत्र झाल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तत्काळ हिंजवडी आयटी पार्कला भेट देऊन परिस्थिती सुधारण्याचे आश्वासन दिले. तरीही परिस्थिती 'जैसे थे' राहिल्याने हिंजवडी आयटी पार्क हैदराबाद व बंगळुरूकडे जात असल्याचे सांगत अजित पवार यांनी शनिवारी करून खळबळ उडवून दिली.

दोन आठवड्यांपूर्वी दिलेल्या सूचनांचे कितपत पालन झाले आहे, हे तपासण्यासाठी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शनिवारी पुन्हा आयटी पार्क, हिंजवडीत पाहणी दौरा केला. यावेळी परिसरात रखडलेली कामे आणि कामात हलगर्जीपणा झालेला दिसताच आक्रमक झाले. यावेळी हिंजवडीचे सरपंच गणेश जांभूळकर यांना खडेबोल सुनावत हिंजवडीचे वाटोळे झाले. आयटी पार्क बंगळुरू, हैदराबादला चालले, असे पवार बोलून गेले.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या आकुर्डी येथील मुख्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिंजवडी परिसरातील वाहतूककोंडीसंबंधी केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. या बैठकीला विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार शंकर मांडेकर, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार,पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पीसीएमसीचे आयुक्त शेखर सिंह, पीएमसीचे आयुक्त नवलकिशोर राम व अन्य अधिकारी उपस्थित होते.

सरपंचांना झापले

या बैठकीपूर्वी पवार यांनी हिंजवडी परिसराची पाहणी केली. पवार यांचा पाहणी दौरा सकाळी सहा वाजता हिंजवडीच्या क्रोमा चौकातून सुरू झाला. यावेळी रस्त्यांची दुरवस्था आणि रखडलेली कामे पाहून त्यांचा पारा चढला

होता. त्याचवेळी हिंजवडी ग्रामपंचायतचे सरपंच गणेश जांभुळकर हे तेथील मंदिर पाडू नये, असा आग्रह करत होते. यावेळी अजित पवारांनी त्यांना चांगलेच सुनावले. पवार म्हणाले "अहो असू द्या हो, धरण बांधताना मंदिरे जातात की नाही? तुम्हाला जे सांगायचं ते सांगा, मी ऐकून घेतो आणि मग मला जे करायचंय ते मी करतो," अशा शब्दांत पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

पवार म्हणाले, "वाटोळे झाले आहे हिंजवडीचे. सगळे आयटी पार्क माझ्या पुणे, महाराष्ट्रातून बाहेर बंगळुरू, हैदराबादला चालले आहेत. तुम्हाला त्याचं काही पडलेलं नाही. मी कशाला सकाळी सहा वाजता इथे आलोय ? हे काम केल्याशिवाय आता गत्यंतर नाही."

गतीने काम पूर्ण करण्याच्या सूचना

राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान (आयटी) हिंजवडी परिसरासह माण, म्हाळुंगे, सूस आदी भागातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, मेट्रोची कामे वेगाने पूर्ण करावीत, विविध विकासकामे करताना स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिकांना विश्वासात घेऊन वाहतूककोंडीचा प्रश्न मार्गी लावा, असे निर्देश पालकमंत्री पवार यांनी दिले.

थेट कारवाईचे आदेश

आयटी पार्क हिंजवडी, माण आणि मारुंजीच्या विकासकामात कोणी आडवा येत असेल तर त्यांच्याविरोधात सरळ ३५३ कलमांतर्गत गुन्हे दाखल करा. कुणाचाही विचार करू नका. मी जरी आडवा आलो तरी माझ्यावर हेच कलम दाखल करा. त्याशिवाय हिंजवडी भागातील रस्ता आणि वाहतूककोंडीचे प्रश्न सुटणार नाहीत, असे आदेश पवार यांनी पिपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे आणि पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांना दिले.

सरकार, पालकमंत्री झोपा काढत होते का? - हर्षवर्धन सपकाळ

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता बंगळुरू व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले, पण पुण्याची अधोगती होईपर्यंत राज्य सरकार व पालकमंत्री अजित पवार काय झोपा काढत होते काय? असा संतप्त प्रश्न विचारून पवारांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

अजित पवार यांचा खरपूस समाचार घेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ म्हणाले की, पुणे हे महाराष्ट्रातील औद्योगिक, सांस्कृतिक व राजकीय घडामोडींचे महत्त्वाचे केंद्र आहे. पुण्याचा नावलौकिक आता इतिहासजमा झाला असून पुण्यात आता कोयता गैंग, ड्रग्जचा काळाबाजार जोरात सुरू आहे. एक पाऊस पडला तरी पुणे जलमय होते. त्यात वाहतूककोंडीची समस्या वाढली आहे, परिणामी आयटी उद्योगाला घरघर लागली आहे. पुण्यासह राज्यातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्था, सत्ताधारी पक्षाचा वाढलेला भ्रष्टाचार, पदाधिकाऱ्यांची गुंडगिरी यांना उद्योजक वैतागले आहेत. पायाभूत सुविधांचा बट्ट्याबोळ झाल्याने आयटी उद्योग दुसऱ्या राज्यात जात आहेत.

logo
marathi.freepressjournal.in