इतिहासकार सावंत धमकी प्रकरण: अखेर प्रशांत कोरटकरला तेलंगणमधून अटक

इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकावणारा आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारा प्रशांत कोरटकर याला पोलिसांनी अखेर तेलंगणमधून ताब्यात घेतले असून त्याला महाराष्ट्रात आणण्यात येत आहे.
इतिहासकार सावंत धमकी प्रकरण: अखेर प्रशांत कोरटकरला तेलंगणमधून अटक
एक्स @koratkarp
Published on

मुंबई : इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकावणारा आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारा प्रशांत कोरटकर याला पोलिसांनी अखेर तेलंगणमधून ताब्यात घेतले असून त्याला महाराष्ट्रात आणण्यात येत आहे.

प्रशांत कोरटकर याच्यावर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीनअर्ज रद्द केल्याने जुना राजवाडा पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला होता. अटकेच्या भीतीने तो दुबईला पळाल्याची चर्चा शनिवारी सकाळपासून प्रसारमाध्यमांमध्ये सुरू होती. दुबईतील त्याचे काही फोटोही व्हायरल झाले होते. यावरून अधिवेशनात विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते.

फिर्यादी सावंत यांनी जुना राजवाडा पोलिसांची भेट घेऊन कोरटकरचा पासपोर्ट जमा करून घेण्यासाठी त्याच्या पत्नीला नोटीस पाठवण्याची विनंती केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही याबाबत माध्यमांनी प्रश्न विचारले. त्यावर कोरटकर कुठेही गेला तरी पोलीस त्याला पकडतील, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला होता. दरम्यान, त्याच्या पत्नीने तपासासाठी नागपुरात असलेल्या कोल्हापूर पोलिसांकडे कोरटकर याचा पासपोर्ट देऊन अफवा आणि चर्चांना पूर्णविराम दिला होता. दरम्यान, सोमवारी पोलिसांनी कोरटकर याला तेलंगण येथून अटक केली.

दरम्यान, या अटकेवर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, तेलंगणमध्ये तो लपल्याची माहिती मिळाली होती. तब्बल एक महिना हा भामटा फिरत होता. इतक्या उशिरा अटक झाली. पण अटक झाली हे महत्त्वाचे आहे. राहुल सोलापूरकर यालाही मोकाट सोडू नये. नागपूर पोलिसांच्या कारभारावर माझे पहिल्यापासून प्रश्नचिन्ह होते. तो नागपुरातून हैदराबादला फरार झाला, असेही मिटकरी म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in