रक्तातून एचआयव्हीची लागण, राज्यात चारपट रुग्ण वाढले

अनेक रक्तपेढ्या या ‘एलिसा’द्वारे एचआयव्हीची तपासणी करतात, ही मूलभूत अडचण आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले. या रुग्णवाढीस अनेक कारणे आहेत
रक्तातून एचआयव्हीची लागण, राज्यात चारपट रुग्ण वाढले

राज्यात रक्तातून एचआयव्हीची लागण होण्याचे प्रमाण चौपट वाढल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. जुलै २०२२ पर्यंत राज्यात २७२ जणांना रक्तातून एचआयव्हीची लागण झाली आहे. ही वस्तुस्थिती चेतन कोठारी यांनी मागवलेल्या माहिती अधिकारातून उघड झाली आहे.

२०२० मध्ये जुलैपर्यंत ४९,२०२१ मध्ये ६८ जणांना, तर २०२२ मध्ये २७२ जणांना रक्तातून एचआयव्हीची लागण झाली. २०१७ ते २०२२ दरम्यान राज्यात १०१० जणांना रक्तावाटे एचआयव्हीची लागण झाली.

अनेक रक्तपेढ्या या ‘एलिसा’द्वारे एचआयव्हीची तपासणी करतात, ही मूलभूत अडचण आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले. या रुग्णवाढीस अनेक कारणे आहेत.

एचआयव्हीचे व संसर्ग आजारांचे सल्लागार डॉ. ईश्वर गिलाडा म्हणाले की, सध्याच्या विकसित जगात रक्तावाटे एचआयव्हीची लागण होणे, हा गुन्हा आहे. ‘नाट’ चाचणी करून रक्तावाटे एचआयव्ही होण्याचे प्रमाण कमी करणे शक्य आहे. ही चाचणी रक्तदात्याची करायची असते. २०२० व २०२१ मध्ये कोरोना काळात आरोग्याचे प्राधान्यक्रम बदलले होते. त्याचा फटका २०२२ मध्ये बसला. अनेक शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या, तर रक्ताचा वापर कमी झाला. त्यामुळे रक्ताची तपासणी करण्यात निष्काळजीपणा घुसला, असे ते म्हणाले.

डॉ. गिलाडा म्हणाले की, ‘नाट’ चाचणीचा वापर करून रक्ताच्या चाचण्यांचा खर्च कमी करण्यासाठी, पूल चाचणी, ५ किंवा अगदी १० नमुने एकत्र केले जाऊ शकतात. त्याची किंमत सध्या पारंपरिक एलिसा किंवा ईआयए चाचण्यांपेक्षा कमी असेल. आम्ही अनेक दिवसांपासून सरकारकडे ही मागणी करत आहेत. मी १९८९ मध्ये हायकोर्टात याचिका दाखल केल्यानंतर महाराष्ट्रात रक्त सुरक्षेचे नियम पाळले जाऊ लागले. १९९८ मध्ये सुप्रीम कोर्टाने देशातील सर्व रक्तपेढ्यांना एचआयव्ही चाचणी करणे सक्तीचे केले.

सरकारी रक्तपेढीतील वरिष्ठ डॉक्टरने सांगितले की, रक्ताद्वारे एचआयव्हीची होणारी लागण हे वास्तव आहे. रक्तपेढ्यांनी ‘नाट’ चाचणी सुरू करावी. तसेच रक्तदात्याचा इतिहास योग्यरीतीने नोंदवून घ्यावा. त्यांना संयमाने प्रश्न विचारावेत. कारण एखाद्या रुग्णाचे अनेकांशी लैंगिक संबंध असल्यास त्यातून एचआयव्हीची लागण होऊ शकते. एक डॉक्टर तीन ते चार तासांत ३०० ते ५०० रक्तदात्यांची माहिती लिहितो. सरकारने अशा टाळता येण्याजोग्या कारणांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.

logo
marathi.freepressjournal.in