अजित पवार गटाच्या पाच आमदारांची घरवापसी?

विधानसभेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) पाच आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची खुलेपणे विधान भवनात भेट घेऊन चर्चा केल्याने अजित पवार गटाचे हे आमदार पुन्हा शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.
अजित पवार गटाच्या पाच आमदारांची घरवापसी?

रोहित चंदावरकर/मुंबई

विधानसभेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) पाच आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची खुलेपणे विधान भवनात भेट घेऊन चर्चा केल्याने अजित पवार गटाचे हे आमदार पुन्हा शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. त्यामुळे अजित पवार यांनीही या आमदारांशी खुलेपणे चर्चा सुरू केली असून त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

या पाचही आमदारांपैकी एकानेही या चर्चेला दुजोरा दिलेला नाही, मात्र त्यांची नावे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या नेत्यांना माहिती आहेत. कारण त्यांच्यात जाहीरपणे चर्चा झाली आहे. या पाच आमदारांपैकी एक जण सातारा येथील असून अन्य आमदार पुणे आणि अहमदनगर येथील आहेत. त्यांनी जयंत पाटील यांची विधान भवनातच भेट घेतली आहे. विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना अशी जाहीर चर्चा करण्यात आल्याने दोन्ही गटांमधील कार्यकर्ते चक्रावून गेले आहेत. नाशिक जिल्ह्यातील एका आमदारासह अन्य दोन आमदारांनी जयंत पाटील यांची अज्ञात स्थळी भेट घेतल्याचे वृत्त आहे. शरद पवार गटाशी पाच आमदार चर्चा करीत असल्याने अजित पवार गटात अस्वस्थता पसरली आहे. त्यामुळे अजित पवार आता कोणती कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अन्य पक्षातील अनेक नेत्यांनी जयंत पाटील यांची मुंबईत भेट घेतल्याची आपल्याला माहिती आहे, याबाबत आपण जयंत पाटील यांच्या संपर्कात आहोत, काही नेत्यांना अथवा लोकप्रतिनिधींना पक्षात घेण्यास आमची तयारी आहे, पक्ष सोडून गेलेल्यांवर आम्ही बंदी घातलेली नाही, परंतु आम्ही प्रत्येक व्यक्तीबाबत चर्चा करून निर्णय घेणार आहोत, असे शरद पवार यांनी शनिवारी पुण्यात वार्ताहरांकडे स्पष्ट केले होते. जे पाच आमदार पुन्हा स्वगृही परतण्यास तयार आहेत त्यांच्या मतदारसंघात शरद पवार गटाकडे तुल्यबळ उमेदवारच नाही. त्यामुळेच शरद पवार त्यांना पुन्हा पक्षात प्रवेश देण्यास उत्सुक आहेत, असे बोलले जाते.

दरम्यान, जयंत पाटील यांची ज्या आमदारांनी भेट घेतली त्यांच्या आम्हीही संपर्कात आहोत, असे अजित पवार गटाच्या एका नेत्याने म्हटले आहे. कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही आणि कोणीही पक्ष सोडून जाणार नाही, असेही अजित पवार गटाच्या नेत्याने स्पष्ट केले आहे. स्वत:च्या विधानसभा मतदारसंघात उमेदवारी मिळाली नाही तर विधान परिषदेत त्याची भरपाई केली जाईल, असेही अजित पवार गटाकडून त्यांना आश्वस्त केले जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in