एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठ भगदाडं पाडलं. यानंतर शिंदेंनी शिवसेना पक्षावरच दावा सांगितला. निवडणूक आयोगानेही एकनाथ शिंदे यांच्या गटाला 'शिवसेना नाव' आणि 'चिन्ह' देऊन 'शिवसेना पक्ष' म्हणून मान्यता दिली. यानंतर उद्धव ठाकरे यांच्या गटाला सुरु झालेली गळती काही केल्या कमी व्हायचं नाव घेत नव्हती. अशा ठाकरे गटाच्या आशा पल्लवीत होणारी बातमी समोर आली आहे.
अलीकडेच विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत शिंदे गटात प्रवेश केला होता. विधान परिषदेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी देखील शिंदे गटात प्रवेश केला. ही गळती सुरु असताना ठाकरे गटासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी आज (२३ ऑगस्ट) ठाकरे गटात जाहीर प्रवेश केला. वाकचौरे हे आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह ठाकरे गटात सामील झाले आहेत.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाऊसाहेब वाकचौरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी ठाकरे गटाचे नेते खासदार विनायक राऊत आणि मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. वाकचौरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री' या निवासस्थानी हाती 'शिवबंधन' बांधलं. यावेळी त्यांच्या सोबत शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी देखील ठाकरे गटात प्रवेश केला. शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर वाकचौरे यांनी काँग्रेस, भाजप असा प्रवास करत पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत घरवापसी केली आहे.
२००९ च्या लोकसभेत वाकचौरे शिवसेनेच्या तिकीटावर शिर्डीतून खासदार झाले होते. यानंतर २०१४ साली त्यांनी काँग्रेसच्या तिकीटावरून शिर्डी लोकसभा लढवली. परंतु शिवसेनेच्या सदाशिव लोखंडे यांनी वाकचौरे यांचा दोन लाख मतांनी पराभव केला होता. आता त्यांची घरवापसी झाल्याने ते पुन्हा ठाकरे गटाकडून शिर्डी लोकसभा लढवणार असल्याचं बोललं जात आहे.