पेण : आपल्या देशातील, राज्यातील विविध गावात काहीतरी विशेष बाब आहे. जसे की आंब्याचा विषय निघाला की ज्याप्रमाणे रत्नागिरी हापूसचा उल्लेख होतो. आग्रा म्हटले की ताजमहाल डोळ्यासमोर दिसतो. अगदी तोच मान गणेशमूर्तींच्या बाबतीत रायगड जिल्ह्यातील पेण या गणपतींच्या गावाला आहे. पेणला कोकणातील पुणे अशा नावानेही ओळखले जाते. कारण पेण येथील कोल्हटकरांची मुलगी पेशव्यांची सून झाल्याने पेणची दुसरी ओळख म्हणजे पोह्याचे पापड तरीही, गणेशमूर्तींच्या कार्यशाळा आणि पेण हे समीकरण काळाच्या ओघात अधिकाधिक घट्ट झाले आहे. गणेशमूर्तींच्या निर्मितीची शतकोत्तर वारसा लाभलेले हे शहर देशाच्याच नाहीतर जगाच्या नकाशावर आपली ओळख बनवून आहे. त्यामुळे केवळ मुंबई-पुणे, इतर राज्येच नाही तर येथे बनणाऱ्या मूर्तींना सातासमुद्रापारही मागणी आहे.
दरवर्षी ज्याप्रमाणे इतर वस्तूंच्या किंमती वाढतात तोच प्रकार या मूर्तींच्या बाबतीतही घडतो, आणि फटाके घ्यायचे जसे कोणी थांबत नाही, तसेच कुरकूर करीत का होईना गणेशमूर्ती घेतल्या जातातच. किंबहुना, पेणमध्ये असे असंख्य मूर्तिकार आहेत ज्यांचे ग्राहक वर्षानुवर्ष बांधलेले आहेत. या ग्राहकांमध्ये दरवर्षी वाढ होताना पहायला मिळते.
गणेशमूर्तींचे माहेरघर पेणच का ? असा प्रश्न काहींना पडणे स्वाभाविकच आहे. पण या मागचे कारण ही उघडच आहे. १८ व्या शतकात मुळचे विजयदुर्गचे असणारे भीकाजीपंथ देवधर हे पेण येथे आले. सन १८६० साली पेण येथे खोतांचे राज्य होते. पूर्वी म्हणजेच १८६० ते १९२० पर्यंत येथील लोक आपल्या अंगणातील मातीच्या सहाय्याने गणेशमूर्ती बनवून त्या पूजल्या जातात. यासाठी श्रीगणेशाच्या मातीच्या मूर्ती बनवत आणि गणपतीला ५ ते ७ दिवसांसाठी पाहुणा म्हणून घरी आणायचे त्याचा पाहुणचार करून पुन्हा त्याच्या घरी पाठवायचे म्हणजे मूर्तीचे वाहत्या पाण्यात विसर्जन करायचे अशी आपल्या धर्मातील प्रथा आहे.
सन १९२० या काळात गणेशमूर्ती बनविन्याची ही कला फक्त मर्यादितच होती. पण १९४० ते १९५० साली लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप दिल्यानंतर पेण येथील देवधरांनी याचा फायदा घेत मातीच्या गणेशमूर्ती बनविण्यास सुरुवात केली. पेणमधील साधारण ७० ते ८० कारागिरांची फौज तयार करून त्यावेळी २०० ते ३०० मूर्ती बनविण्यास सुरुवात केली. प्रत्येक कारागिराला २ ते ५ रुपये पगार दिवसाला मिळू लागला. तयार झालेल्या गणेशमूर्ती मुंबई आणि पुण्याला विकण्यासाठी ते गणेशोत्सवाच्या १० ते २० दिवस आधी घेऊन जात. अनेक वर्षांच्या ठराविक वेळापत्रकाप्रमाणे टप्प्याटप्प्याने मूर्ती घडविण्याचे काम वेग घेते आणि साधारण जुलैपासून या मूर्तींची पाठवणी सुरू होते.
या व्यावसायिकांचे अर्थकारणही असेच शिस्तबद्ध आहे. जवळपास प्रत्येक व्यावसायिक पेणमधील राष्ट्रीयकृत बँकांमधून १० लाख रुपयांचे कॅश क्रेडिट घेतो. मूर्तीं साठीचा कच्चा माल घेण्यापासून ते कामगारांचा पगार आदींसाठी ही रक्कम खर्ची केली जाते. या मूर्ती शाळांमध्ये नकळत दोन प्रकारची विभागणी झाल्याचे दिसते. मूर्ती घडविण्यापासून रंगकाम व अंतिम साज देण्याचे काम पेण शहरातील मूर्ती शाळांत केले जाते. या मूर्तींच्या डोळ्यांची आखणी हे पेणचे वैशिष्ट्य आहे.
दिवसाला २०० ते १००० रुपये
१० वर्षांपूर्वी आमच्या गावात फक्त २० ते २५ कारखाने होते. परंतु आता कच्च्या गणेशमूर्तींची वाढती मागणी पाहता आजमितीला आता जवळजवळ शंभरहून अधिक कारखाने आमच्या हमरापूर गावात उभारले गेले आहेत. आमच्या गावात अगदी १ फुटापासून १५ फुटापर्यंत मूर्ती बनविल्या जातात. साधारणतः १०० रुपयांपासून ते ५० हजार रुपयांपर्यंत या मूर्ती आम्ही विकतो. त्यामुळे कोट्यावधी रुपयांची उलाढाल वर्षभरात आमच्या गावात होते. शेती आणि मासेमारी हे व्यवसाय लोप पावत चालले असल्याने येथील तरुणांसमोर रोजगार निर्मितीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. यामध्ये काही जण रोजंदाजीवर तर काहीजण नगावर काम करतात. त्यामुळे हे कामगार दिवसाला २०० ते १००० रुपये कमवितात.
कच्च्या गणेशमूर्तींचे माहेरघर हमरापूर!
गणपतींचे माहेरघर हे पेण आहेत. परंतु प्लास्टर ऑफ पॅरिसच्या कच्च्या गणेशमूर्ती कुठे बनविल्या जात असतील तर त्या पेण तालुक्यातील हमरापूर गावामध्ये. म्हणूनच या हमरापूर गावाला कच्च्या गणेशमूर्तींचे माहेरघर संबोधले जाते. संपूर्ण जगभरात ज्या सुंदर व सुबक मूर्ती पोहोचतात ते पेणमधील ९० % गणेश मूर्तिकार या हमरापूर गावातूनच कच्च्या गणेशमूर्ती आणतात आणि मग रंगवतात. शेती आणि मासेमारी हा प्रमुख व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करणारा या गावातील माणूस कच्च्या गणेशमूर्ती बनवू लागला.
पेणमध्ये कशा बनल्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती!
पेणमध्ये सुरवातीच्या काळात मातीच्याच मूर्ती बनत पण माती वजनाने जड आणि सुकण्यासाठी ३ ते ५ दिवसांचा अवधी घेत असल्याने गणपतीच्या मूर्ती वेळेत पूर्ण होत नसत. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे प्रदर्शन मुंबई येथे लागले आहे. असे देवधरांची तिसऱ्या पीढीतील राजाभाऊ देवधर आणि वामनराव देवधर यांना समजल्यावर, क्षणाचाही विलंब न करता आपल्या काही कारागिरांना सोबत घेऊन त्यांनी मुंबई गाठली. देवधरांच्या कारखान्यातील कारागीर तेथून बाहर पडून स्वतःचा गणेशमूर्ती बनविण्याचा कारखाना थाटू लागले. सुरुवातीला हाताच्या बोटावर मोजण्या इतके असणाऱ्या या कार्यशाळांनी २००, ३०० आणि आता ७०० चा आकडा केव्हा पार केला हे कळलेच नाही. पेण शहरात सद्यस्थितीत तब्बल छोटेमोठे ७५० मूर्तीशाळा आहेत आणि पेण तालुक्याचा विचार केला तर ही संख्या हजाराच्या वर जाते. एका मूर्तीशाळेत किमान दोन ते तीन हजार मूर्ती होत असतील आणि त्यातील प्रत्येक मूर्तीची किंमत किमान पाच-सातशे रुपये आहे, असे मानले तर हजार मूर्ती शाळांमधून किती कोटींची उलाढाल होत असेल, याचा केवळ अंदाजच करावा!