इ. १२ वीची प्रवेशपत्रे १२ जानेवारीपासून उपलब्ध; ऑनलाइन डाऊनलोड; विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारण्यास मनाई

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेसाठीची ऑनलाइन प्रवेशपत्रे सोमवार, दि. १२ जानेवारीपासून उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेसाठीची ऑनलाइन प्रवेशपत्रे सोमवार, दि. १२ जानेवारीपासून उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे.

राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी यासंदर्भात अधिकृत प्रकटन प्रसिद्ध केले आहे. सर्व उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना त्यांच्या लॉगिनमधून ही प्रवेशपत्रे डाऊनलोड करता येणार आहेत.

मूळ प्रवेशपत्र हरवल्यास महाविद्यालयाने पुन्हा प्रिंट काढून त्यावर लाल शाईने ‘द्वितीय प्रत (Duplicate)’ असा स्पष्ट शेरा देऊन विद्यार्थ्याला द्यावा. या सर्व सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करून विद्यार्थी व पालकांना सहकार्य करण्याचे आवाहन राज्य मंडळाने केले आहे.

सक्त आदेश

मंडळाच्या सूचनेनुसार www.mahahsscboard.in या संकेतस्थळावरून प्रवेशपत्रे डाऊनलोड करावीत. डाऊनलोड केलेल्या प्रवेशपत्रांची प्रिंट काढून त्यावर संबंधित मुख्याध्यापक/प्राचार्यांचा शिक्का व स्वाक्षरी अनिवार्य आहे. प्रवेशपत्राची प्रिंट देताना विद्यार्थ्यांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारू नये, असे कडक आदेश मंडळाने दिले आहेत. तांत्रिक अडचणी आल्यास शाळांनी संबंधित विभागीय मंडळाशी संपर्क साधावा.

प्रवेशपत्र डाऊनलोडचे पर्याय :

शुल्क भरलेल्यांसाठी: ‘Paid Status Admit Card’

शुल्क उशिरा अपडेट झालेल्यांसाठी: ‘Late Paid Status Admit Card’

उशिरा अर्ज/जादा आसन क्रमांक असलेल्यांसाठी: ‘Extra Seat No Admit Card’

नाव, जन्मतारीख किंवा इतर तपशिलांत चूक असल्यास ‘Application Correction’ लिंकद्वारे ऑनलाइन दुरुस्ती करावी. विभागीय मंडळाच्या मान्यतेनंतर ‘Correction Admit Card’ लिंकवरून सुधारित प्रवेशपत्र डाऊनलोड करता येईल. विषय किंवा माध्यम बदलासाठी विभागीय मंडळाशी प्रत्यक्ष संपर्क साधून प्रचलित पद्धतीने दुरुस्ती करावी लागेल.

प्रवेशपत्रावरील फोटो अस्पष्ट/चुकीचा असल्यास नवीन फोटो चिकटवून प्राचार्यांचा शिक्का व स्वाक्षरी घेणे बंधनकारक आहे.

logo
marathi.freepressjournal.in