रामभाऊ जगताप /कराड
हुबळी ते पुणेदरम्यान धावणाऱ्या वंदे भारत रेल्वेची गुरुवारी दुपारी हुबळी ते मिरज या दरम्यान चाचणी घेण्यात आली असून सदर चाचणी यशस्वी झाल्यामुळे हुबळी ते पुणे दरम्यान वंदे भारत रेल्वे धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र मिरज ते पुणे दरम्यानची या गाडीची चाचणी अद्यापही न झाल्याने येत्या रविवारी या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार का नाही व येत्या सोमवारपासून ती पुणे ते हुबळी दरम्यान धावणार की नाही, याबात येथे उत्सुकता निर्माण झाली आहे.
पुणे-हुबळी आणि नागपूर-सिकंदराबाद या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस येत्या सोमवारी १६ पासून सुरू होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झारखंडच्या जमशेदपूर येथून या गाड्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. त्याचबरोबर या वंदे भारत गाड्यांसह पश्चिम महाराष्ट्रातील मुंबई-कोल्हापूर या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होण्याची शक्यता रेल्वेच्या येथील सूत्रांनी व्यक्त केली आहे. त्यानुसार हुबळी ते मिरज दरम्यानच्या मार्गावरून गुरुवारी दुपारी या गाडीची यशस्वी चाचणी घेण्यात आली.
पुणे - मिरज-कोल्हापूर हा रेल्वे मार्ग मध्य रेल्वेच्या पुणे विभागांतर्गत येत असून या मार्गावरील दुहेरीकरणासह विद्युतीकरणाची कामे एखादा अपवाद वगळता जवळजवळ पूर्ण झाल्याने या मार्गावरून अतिरिक्त वेगाने धावणाऱ्या एक्स्प्रेस चालवणे शक्य होणार असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मध्य रेल्वेकडून सध्या मुंबई-सोलापूर,मुंबई-मडगाव, मुंबई-शिर्डी साईनगर या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस चालवल्या जात आहेत. पश्चिम रेल्वेकडून मुंबई सेंट्रल ते गांधीनगर आणि मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस चालवली जाते. यामध्ये आता पुणे-नागपूर,नागपूर-सिकंदराबाद, पुणे-हुबळी व मुंबई-कोल्हापूर या मार्गांवरील वंदे भारत एक्स्प्रेसची भर पडणार आहे.
पंतप्रधान यांच्या हस्ते दोन टप्प्यांत लोकार्पण सोहळा
पुणे ते हुबळी मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दोन टप्यांत 'वंदे भारत एक्स्प्रेस'चा लोकार्पण सोहळा होणार आहे. येत्या रविवारी १५ व सोमवारी १६ सप्टेंबर रोजी मोदी हे वंदे भारत एक्स्प्रेसचे उद्घाटन करणार आहेत. पुणे-हुबळी वंदे भारत एक्स्प्रेसचे उद्घाटन १५ सप्टेंबरला होणार होते. मात्र,रेल्वे बोर्डाने आता उद्घाटनाची तारीख बदलून १६ सप्टेंबर केली आहे. पुणे-हुबळी एक्स्प्रेसला सातारा, कराड, सांगली, मिरज, कोल्हापूर, बेळगाव, धारवाड या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे, असेही रेल्वे सूत्रांचे म्हणणे आहे तर पुणे व कोल्हापूर अशा दोन स्थानकांवर या रेल्वेचा उद्घाटन सोहळा होणार असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली आहे.
मिरज ते पुणेच्या आगमनाची आतुरतेने प्रतीक्षा
मिरज ते पुणे दरम्यानची या गाडीची चाचणी अद्यापही घेण्यात आलेली नाही. त्यामुळे सदर गाडी येत्या १६ पासून सुरू होणार का? याबाबत येथील प्रवाशांच्यातून उत्सुकता व्यक्त होत आहे. सध्या पुणे-मिरज-कोल्हापूर या रेल्वे मार्गावरून एकही वंदे भारत गाडी सुरू करण्यात आलेली नाही,त्यामुळे सदर गाडी सोमवारपासून सुरू झाल्यास या मार्गावरील प्रवासाचा वेळ कमी होत प्रवास वेगवान होणार आहे. यासाठी प्रवासी या गाडीच्या आगमनाची आतुर प्रतीक्षा पाहत आहेत.