लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांचे उपोषण तूर्त स्थगित

राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेतल्यानंतर इतर मागासवर्ग आंदोलनाचे कार्यकर्ते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी शनिवारी आपले उपोषण तूर्त स्थगित केले.
लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांचे उपोषण तूर्त स्थगित
Facebook

जालना : राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेतल्यानंतर इतर मागासवर्ग आंदोलनाचे कार्यकर्ते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी शनिवारी आपले उपोषण तूर्त स्थगित केले. इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का लावण्यात येऊ नये या मागणीसाठी हाके आणि वाघमारे यांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते.

इतर मागास वर्गवारीतून मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी केली होती. त्याविरुद्ध हाके आणि वाघमारे यांनी १३ जूनपासून बेमुदत उपोषण सुरू केले होते. आम्ही तूर्त आमचे बेमुदत उपोषण स्थगित करीत आहोत, आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पुन्हा उपोषण करण्यात येईल, असे हाके यांनी वडीगोद्री येथे राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेतल्यानंतर स्पष्ट केले.

मराठ्यांच्या सगेसोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत सरकारने अधिसूचनेचा मसुदा जारी केला होता त्याला आक्षेप घेण्याबाबतची श्वेतपत्रिका जारी करण्यात आली पाहिजे, असे ते म्हणाले. ओबीसी समाजाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात १२ सदस्यांचा समावेश होता.

आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारने २९ जून रोजी एक सर्वपक्षीय बैठक बोलाविली असून त्यासाठी हाके आणि वाघमारे यांना निमंत्रित करण्यात आले आहे, असे भुजबळ म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी मुंबईत आयोजित केलेल्या बैठकीत ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावण्याचा आणि काही मराठ्यांना बनावट कुणबी प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत त्याविरुद्ध कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे भुजबळ म्हणाले.

मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्रे द्यावी अशी मागणी जरांगे-पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली असून त्याला ओबीसी समाजाने विरोध केला आहे. ओबीसी दर्जाची मागणी करण्याऐवजी मराठ्यांनी सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक क्षेत्रात स्वतंत्र आरक्षणाची मागणी करावी, अशी विनंती भुजबळ यांनी मराठा समाजाला केली आहे.

जातीय तणाव निर्माण होऊ देणार नाही - मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट

नाशिक : समाजात जातीवरून तणाव निर्माण होणार नाही याची राज्य सरकार खबरदारी घेईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे वार्ताहरांना सांगितले. आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आणि इतर मागासवर्ग आपापल्या भूमिकांवर ठाम असल्याच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी वरील बाब स्पष्ट केली. ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी उपोषण मागे घेतल्याबद्दल शिंदे यांनी त्यांचे आभार मानले आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावरून दोन समाजांत तेढ निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात होती, त्या अनुषंगाने शिंदे यांनी समाजामध्ये तणाव निर्माण न होऊ देण्याची हमी दिली आहे.

logo
marathi.freepressjournal.in