मी नाराज नाही, मला राज्याच्या राजकारणातच रस - अजित पवार

मी आमदार निवडीचे काम करत होतो. आता मला कोणी थांबवणार आहे का, असा सवाल त्यांनी केला
मी नाराज नाही, मला राज्याच्या राजकारणातच रस - अजित पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची निवड केली. यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा रंगू लागल्या. मात्र, आता अजित पवार यांनीच यावर उत्तर दिले आहे. ‘‘मी कोणत्याही प्रकारे नाराज नाही. मला केंद्रीय राजकारणात कोणत्याही प्रकारचा रस नाही. मला महाराष्ट्राच्या राजकारणातच रस आहे. मी विरोधी पक्षनेता आहे. यापूर्वी कोणतेही पद नसताना मी आमदार निवडीचे काम करत होतो. आता मला कोणी थांबवणार आहे का, असा सवाल त्यांनी केला आहे. मी नाराज नसताना नाराज असल्याच्या बातम्या का पसरविण्यात येतात, असेही ते म्हणाले. दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी अजित पवार हे विरोधी पक्षनेते आहेत. हे पद मुख्यमंत्रिपदाला समानांतर असते. कार्यकारी अध्यक्ष झाल्यानंतर माझे राज्यातील रिपोर्टिंग अजित पवार यांच्याकडेच असणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद सोडत असल्याची घोषणा एका कार्यक्रमात केली. त्यावेळी एकच गदारोळ झाला. कार्यकर्त्यांनी भावूक होत त्या कार्यक्रमातच शरद पवार यांनी पद सोडू नये, अशी गळ घातली. त्यानंतर वरिष्ठ नेत्यांची समिती नेमण्यात आली. या समितीनेही शरद पवार यांनीच अध्यक्षपदी राहावे, असे मत दिले. त्यानंतर अचानक पक्षाच्या वर्धापनदिनी शरद पवार यांनी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केल्याची घोषणा केली. दिल्लीत झालेल्या या कार्यक्रमाला सुप्रिया सुळे अनुपस्थित होत्या, मात्र अजित पवार होते. या घोषणेनंतर अजित पवार दिल्लीतून निघाले. अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा यानंतर सुरू झाल्या. रविवारी पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांनी या प्रकरणी आपली भूमिका मांडली.

मला केंद्रीय राजकारणात रस नसल्याचे सांगून अजित पवार म्हणाले, बारामतीकरांनी मला १९९१ साली खासदार म्हणून निवडून दिले. सहा महिने खासदार म्हणून राहिलो. तिथले चित्र बघितले. माझी कामाची पद्धत आणि राष्ट्रीय पातळीवरील कामाची पद्धत वेगळी आहे. त्याचवेळी ३०-३२ वर्षांपूर्वीच ठरविले की, आपण महाराष्ट्रात काम करायचे. तेव्हापासून मी महाराष्ट्रात काम करत आहे. महाराष्ट्रात मी विरोधी पक्षनेता आहे. यापूर्वी कोणतेही पद नसताना मी आमदार निवडीचे काम करत होतो. आता मला कोणी थांबवणार आहे का, असा सवालही अजित पवार यांनी केला. नवीन लोक येत असतात. जुने लोक सोडून जात असतात. आता देखील विधिमंडळात आम्ही सत्ताधारी बाकांवर पाहतो तेव्हा आमच्यातीलच चाळीस-पन्नास चेहरे समोर दिसतात. भाजपमधीलही काही नेते आमच्याकडे आले आहेत. ही प्रक्रिया सुरूच असते. कोणाचेही कोणावाचून अडत नसते, असेही अजित पवार म्हणाले.

राष्ट्रवादीच्या निर्णयावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, याला भाकरी फिरविणे म्हणत नाहीत. त्यावर अजित पवार म्हणाले, हा आमचा पक्षांतर्गत निर्णय आहे. तसेच भाकरी फिरवली असे शरद पवार म्हणालेलेच नाहीत. हा प्रसारमाध्यमांनी वापरलेला शब्द आहे. देवेंद्र फडणवीस हे मोठे नेते आहेत. भाजपने त्यांच्या पक्षात काय करायचे हा त्यांचा प्रश्न आहे. राष्ट्रवादीने काय करायचे हा आमचा अंतर्गत प्रश्न असल्याचे अजित पवार म्हणाले.

राज्यातील रिपोर्टिंग अजितदादांनाच -सुप्रिया सुळे

‘‘अजित पवार हे राज्यातील विरोधी पक्षनेते आहेत. विरोधी पक्षनेतेपद हे मुख्यमंत्रिपदाला समानांतर असते. मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्याची राज्यात प्रमुख भूमिका असते. मी कार्याध्यक्ष झाल्यानंतर राज्यातील माझे रिपोर्टिंग हे अजित पवार यांच्याकडेच असणार असल्याची प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. याचाच अर्थ अजित पवार यांचे राज्यातील स्थान अबाधित असणार असल्याचेच सूतोवाच सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in