मी आता राजकारणातून रिटायर्ड -अमिता चव्हाण; जनतेची इच्छा असेल, तर श्रीजया निवडणूक लढवेल

आता मी सध्या गृहिणीच्या भूमिकेत असून, आमची कन्या श्रीजया चव्हाण यांना जर भोकर विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी निवडणूक लढविण्याचा आग्रह धरला
मी आता राजकारणातून रिटायर्ड -अमिता चव्हाण;  
जनतेची इच्छा असेल, तर श्रीजया निवडणूक लढवेल

नांदेड : "माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी पाच दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या निर्णयामध्ये कुटुंबातील आम्ही सर्व सदस्य सहभागी होतो. आता मी सध्या गृहिणीच्या भूमिकेत असून, आमची कन्या श्रीजया चव्हाण यांना जर भोकर विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी निवडणूक लढविण्याचा आग्रह धरला तर, ती निश्चित निवडणूक लढवेल असे मत माजी आमदार अमिता चव्हाण यांनी व्यक्त केले.

संगीत शंकर दरबार व कुसुम महोत्सव या दोन सांस्कृतिक कार्यक्रमांच्या निमित्ताने अमिता चव्हाण पत्रकारांशी संवाद साधत होत्या. यावेळी युवानेत्या श्रीजया चव्हाण यांची विशेष उपस्थिती होती. त्या पुढे म्हणाल्या की, भोकर विधानसभा मतदारसंघ हा श्रद्धेय डॉ. शंकरराव चव्हाण, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण व मीही सांभाळला आहे. या मतदारसंघात चव्हाण कुटुंबीयांवर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते आहेत.

आम्ही कोणतीही निवडणूक लढवत असताना जनतेचे मत लक्षात घेत असतो. श्रीजया चव्हाण यांना चव्हाण कुटुंबीयांचा वारसा आहे. असे असले, तरी आम्ही मतदारांवर उमेदवार लादणार नाही, तर जनतेने श्रीजया चव्हाण निवडणूक रिंगणात यावे यासाठी आग्रह धरला, तर ती निश्चित निवडणूक लढवेल, असेही त्या म्हणाल्या.

मी निवडणूक लढविण्यास तयार -श्रीजया चव्हाण

यासंदर्भात श्रीजया चव्हाण यांना पत्रकारांनी विचारले असता, त्यांनी अमिता चव्हाण यांच्या मताचे समर्थन करत भोकरमधील जनता व माझे वडील यांनी जर इच्छा व्यक्त केली, तर मी निवडणूक लढविण्यास तयार असल्याचे सांगून त्यांनी आपल्या राजकीय एन्ट्रीचा सुतोवाच केला.

logo
marathi.freepressjournal.in