माझ्याकडे दोनच पर्याय, तुरुंग किंवा पक्ष बदलणे! शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकरांच्या गौप्यस्फोटाने खळबळ

मला चुकीच्या पद्धतीने भ्रष्टाचार प्रकरणात गोवण्यात आले. माझ्यावर तर दबाव होताच, पण...
माझ्याकडे दोनच पर्याय, तुरुंग किंवा पक्ष बदलणे! शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकरांच्या गौप्यस्फोटाने खळबळ

मुंबई : ‘मला चुकीच्या पद्धतीने भ्रष्टाचार प्रकरणात गोवण्यात आले. माझ्यावर तर दबाव होताच, पण माझ्या पत्नीचेही नाव गोवल्यानंतर माझ्यापुढे पर्याय उरला नाही. तुरुंगात जाणे किंवा पक्ष बदलणे, हे दोनच पर्याय माझ्याकडे होते. त्यामुळे जड अंतःकरणाने मी पक्ष बदलण्याचा निर्णय घेतला’, असा गौप्यस्फोट उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी केल्याने खळबळ माजली आहे.

रवींद्र वायकर यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत एका आघाडीच्या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत हे भाष्य केले आहे. रवींद्र वायकर यांनी काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाचा हात सोडून शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात उमेदवारी जाहीर करण्यात आली.

वायकर पुढे म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वेळेपासून मी हाती शिवबंधन बांधले. बाळासाहेबांच्या शिवसेनेत ५० वर्षे राहिल्यानंतर मला उद्धव ठाकरेंची साथ सोडावी लागली. नियतीपुढे कुणाचे काही चालत नाही हेच खरे.

माझ्या मदतीसाठी कुणी पुढे आले नाही

‘माझ्याविरोधात झालेली तक्रार ही फौजदारी स्वरुपाची नव्हतीच. मला सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढावे लागले. माझे प्रकरण राजकीय होते, असे वकिलांनीही मला सांगितले. पण माझ्या मदतीसाठी कुणीही पुढे आले नाही. त्यामुळे माझ्यासमोर दुसरा पर्याय नव्हता,’ असे वायकर म्हणाले.

आपल्या वक्तव्याचा विपर्यास -वायकर

उत्तर पश्चिम मुंबईतील शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत दबावामुळे आपण पक्ष बदलला, असे वक्तव्य केले होते. एकतर तुरुंगात जाणे किंवा पक्ष बदलणे हे पर्याय उरले होते, अशी स्पष्ट कबुली वायकर यांनी दिली होती. त्यांच्या या वक्तव्याचे राज्याच्या राजकारणात पडसाद उमटले. आता आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचे वायकर यांनी स्पष्ट केले आहे.

ते म्हणाले की, “मुलाखतीत मी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. चौकशी सुरू असताना मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दोन-तीनदा भेटलो होतो. त्यांच्यासोबत झालेल्या चर्चेत त्यांनी सर्व ऐकून घेतल्यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बोलवून घेतले आणि त्यांना विचारणा केली होती. मी सर्व चौकशांना सामोरा गेलो आहे. माझ्यावरील आरोप खोटे असल्याचे त्यांना सांगितले होते. उद्धव ठाकरेही मला तीनवेळा भेटले. त्यावेळी माझ्यावर आलेल्या संकटातून मार्ग काढा. आपण पंतप्रधानांना फोन केला तर जे चुकीचे आहे ते थांबेल, असे मी त्यांना सांगितले. पण, त्यांनी तसे करण्यास नकार देत मला चौकशीला सामोरे जाण्यास सांगितले. वास्तविक माझ्यामागे पक्षप्रमुखांनी उभे राहायला हवे होते. त्याच्यातून माझी सोडवणूक करायला पाहिजे होती. पण तसे झाले नाही. त्यानंतर मी पक्षप्रवेश करण्याचा निर्णय घेतला.”

ठाकरे गटाकडून अपात्रतेची नोटीस

रवींद्र वायकर हे अजूनही ठाकरे गटाचे आमदार आहेत. त्यांनी आमदारकीचा राजीनामा न देता शिंदे सेनेत प्रवेश केल्या प्रकरणी संविधानाच्या १०व्या सुचीनुसार रवींद्र वायकर यांच्याविरोधात ठाकरे गटाकडून अपात्रतेची नोटीस बजावण्यात आली आहे. ठाकरे गटाचे नेते अनिल परब म्हणाले, “केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे दोन्ही वेगवेगळे पक्ष असल्याचे आपल्या निकालात म्हटले आहे. तसेच विधानसभा अध्यक्षांसमोर झालेल्या सुनावणीतही दोन सेना असल्याचे स्पष्ट झाले आहे. अध्यक्षांनी अपात्रतेच्या याचिकांवर निकाल दिला, तेव्हा वायकर आमच्या पक्षात होते. आजही ते शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार आहेत. त्यामुळे आम्ही वायकरांना अपात्रतेची नोटीस बजावली आहे.”

logo
marathi.freepressjournal.in