
पुणे : मुख्यमंत्रीपदाची दोन वेळा संधी होती, मात्र ओबीसींच्या लढ्यासाठी दोनही वेळा ती संधी सोडली, असा दावा माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केला. राजकीयदृष्ट्या राष्ट्रवादी काँग्रेस सध्या भारतीय जनता पक्षाबरोबर आहे, मात्र त्यांच्याबरोबर लग्न केलेले नाही, असे ते म्हणाले. मंत्रिपद दिले नाही याचे दु:ख निश्चित होते, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सतर्फे नऱ्हे येथील संस्थेच्या सभागृहात आयोजित आठव्या युवा संसदेमध्ये २ रा संसद कट्टा अंतर्गत शुक्रवारी सकाळी भुजबळ यांची विशेष मुलाखत झाली. भुजबळ यांनीही त्यांच्या बिनधास्त स्वभावाला साजेशी भाषा वापरत आपला राजकीय पट उलगडून दाखवला.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सन २०१४ मध्ये भाजपला बाहेरून पाठिंबा दिला. त्यानंतर पुढे अनेक वर्षं ते यासंदर्भात कायम तळ्यातमळ्यात भूमिका घेत होते. मला ते पटत नव्हते, अखेर मी अजित पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. आम्ही सध्या राष्ट्रवादी पक्ष म्हणून राजकीयदृष्ट्या भाजपसोबत आहोत, पण भाजपसोबत लग्न केलेले नाही, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
तुम्ही राज्यपाल होणार का, या प्रश्नावर भुजबळ यांनी उत्तर दिले, हा छगन भुजबळच्या तोंडाला कुलुप लावण्याचा प्रकार आहे. ते पद मोठे आहे, मानाचे आहे, त्या पदाचा मला अवमान करायचा नाही, मात्र त्या पदावर राहून सर्वसामान्यांसाठी बोलू शकत नाही, भांडू शकत नाही. त्यामुळे हे पद स्वीकारणार नाही.