"मी १६ नोव्हेंबरला मंत्रिमंडळाचा राजीनामा देऊनच...", छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट

"मी भाषण करतो तर विरोधी पक्षाचे नेते राजीनामा मागतात. माझ्या सरकारमधील नेते सुद्धा बोलताय. काल एक जण काहीतरी बडबला की, भुजबळच्या कमरेत लाथ घालून त्याला मंत्रिमंडळच्या बाहेर काढा. १७ नोव्हेंबरला..."
"मी १६ नोव्हेंबरला मंत्रिमंडळाचा राजीनामा देऊनच...", छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट

मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी राज्यातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी करत उपोषण सुरु केले. जरांगे यांच्या या मागणीला राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सुरुवातीपासूनच उघडपणे विरोध केला. यानंतर अनेकांनी भुजबळांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडूनही भुजबळांनी सरकारमध्ये राहुन याविषयी बोलू नये, असे सांगितले गेले. यावर आता भुजबळ यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. मी १६ नोव्हेंबरलाच मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला, मगच १७ नोव्हेंबर रोजी अंबड येथील सभेला आलो, असे भुजबळ यांनी सांगितले.

"मी भाषण करतो तर विरोधी पक्षाचे नेते राजीनामा मागतात. माझ्या सरकारमधील नेते सुद्धा बोलताय. काल एक जण काहीतरी बडबडला की, भुजबळच्या कमरेत लाथ घालून त्याला मंत्रिमंडळाच्या बाहेर काढा. १७ नोव्हेंबरला ओबीसीची पहिली रॅली अंबडला झाली. १६ नोव्हेंबरलाच मी मंत्रिमंडळाचा राजीनामा देऊन सभेला गेलो", असा गौप्यस्फोट भुजबळ यांनी केला. तसेच, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी याची वाच्यता नको असे सांगितल्याने मी अडीच महिने शांत राहिलो, असेही भुजबळ म्हणाले. आज अहमदनगर येथे आयोजित केलेल्या ओबीसींच्या महाएल्गार मेळाव्यात ते बोलत होते.

शिवरायांची शपथ पूर्ण झाली, तर मागासवर्गीय आयोग कशासाठी?

यावेळी बोलताना भुजबळ म्हणाले, मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अवमान करायचा नाही, पण प्रश्न निर्माण झाले आहेत. तुम्ही त्या मोर्चात मराठ्यांना आरक्षण देऊन छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतलेली पूर्ण केल्याचे जाहीर केले. त्यामुळे शिवरायांची शपथ पूर्ण झाली असेल, तर मागासवर्गीय आयोग कशासाठी? असा सवाल त्यांनी मुख्यमंत्र्यांना केला.

खोटी वंशावळ जोडण्याचे प्रकार सुरू

३६० कोटी रुपये खोटे रेकॉर्ड तयार करण्यासाठी देण्यात आले का? अशी विचारणा भुजबळ यांनी केली. नोंदीमध्ये खाडाखोड केली जात आहे. सगेसोयरे म्हणून खोटी प्रमाणपत्रे दिली जात आहेत. हायकोर्टाचा निकाल आहे. त्यात न्यायाधीशांनी स्पष्ट म्हटले आहे, सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्रे दिली तर ओबीसींचे आरक्षण संपून जाईल असे निकालात सांगितले आहे. कोणाशी लग्न केले तरी तुम्ही आरक्षणास पात्र ठरणार नाही असे सुप्रीम कोर्टाचे जजमेंट आहे. खोटी वंशावळ जोडण्याचे प्रकार सुरू आहेत, असा आरोपही भुजबळ यांनी यावेळी केला.

मराठा समाजाच्या नेत्यांची कीव येते-

"मला मराठा समाजाच्या नेत्यांची, विचारवंताची कीव येते, हा तुमचा नेता कसा? जो बजेटमधून आरक्षण देता येते का बघा असे म्हणतो, कुणी बोलायला तयार नाही. कुणाच्या मागे जाताय? गावागावात दरी पडतेय, आम्ही आमच्या हक्काची लढाई लढतोय. मराठा समाजाला त्यांचे वेगळे आरक्षण द्या, आमच्यातून नको असे बोलणे चूक आहे. ओबीसीतून आरक्षण घ्यायचे आणि मंडल आयोगालाच आव्हान देण्याची भाषा केली जाते", असे म्हणत एकावर अन्याय झाल्यास सर्वांनी एकत्रित उभे राहण्याचे आवाहन त्यांनी ओबीसी समाजाला केले.

logo
marathi.freepressjournal.in