मी कधीच लाचारी मान्य करणार नाही; प्रकाश आंबेडकर यांचा मविआला टोला

लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत महाविकास आघाडीसोबत चर्चेच्या अनेक फेऱ्या होऊनही तोडगा निघत नसल्याने संतापलेल्या आंबेडकर यांनी महाविकास आघाडीला २६ मार्चपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे.
मी कधीच लाचारी मान्य करणार नाही; प्रकाश आंबेडकर यांचा मविआला टोला
Published on

प्रतिनिधी/मुंबई

माझ्या आजोबांची चळवळ लाचारीच्या विरोधात होती. त्यामुळे मीसुद्धा लाचारी मान्य करणार नाही. युतीमध्ये अडचण येऊ नये म्हणून व्यक्तिगत वाद किंवा हेवेदावे येऊ दिले नाही. पण, जिथे चळवळीलाच लाचार केले जाते आणि संपवले जाते, त्या ठिकाणी आम्ही हे मान्य करणार नाही, अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना सुनावले.

लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत महाविकास आघाडीसोबत चर्चेच्या अनेक फेऱ्या होऊनही तोडगा निघत नसल्याने संतापलेल्या आंबेडकर यांनी महाविकास आघाडीला २६ मार्चपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. त्यानंतर आंबेडकर बुधवारी पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका मांडणार आहेत. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी आघाडीला शेवटचा इशारा दिला. “वंचित बहुजन आघाडी जी भूमिका घेईल त्या भूमिकेला फुले-शाहू-आंबेडकरी विचारांच्या माणसांचा शंभर टक्के पाठिंबा मिळेल,” असा विश्वासही आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने दिलेला चार जागांचा प्रस्ताव वंचितने धुडकावला आहे. तसेच आंबेडकर यांनी गेल्या आठवड्यात शिवसेना उद्धव ठाकरे गटासोबतची युती आता राहिली असल्याचे विधान केले होते. त्यामुळे वंचित महाविकास आघाडीसोबत जाणार नाही, हे निश्चित मानले जात आहे. वंचितच्या अल्टिमेटमला काही तास शिल्लक असताना आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधणारा व्हिडीओ प्रसारित केला.

“वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते तसेच हितचिंतकांनी युतीच्या संदर्भात काय केले पाहिजे, याविषयी सल्ला दिला. त्यामुळे त्यांचे मन:पूर्वक आभार. सर्व शाहू-फुले-आंबेडकरी मतदाराला माझे आवाहन आहे की, आपण जिंकलो पाहिजे, ही भावना आहे. अनेक ठिकाणी आपण जिंकलो आहोत. तेव्हा चळवळीचा विचार हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. आपण सार्वजनिक जीवन जगतो. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी जो सार्वत्रिक निर्णय घेतला जातो, त्याला मानसन्मान आपण दिला पाहिजे. तसेच त्याप्रमाणे वागले पाहिजे,” असेही आंबेडकर यांनी म्हटले आहे.

वंचितचा प्रस्ताव शरद पवार, ठाकरे यांनी मान्य करावा - नाना पटोले

सांगली आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघ काँग्रेसच्या परंपरागत जागा आहेत. या जागांवर काँग्रेस पक्षाकडे चांगले उमेदवार आहेत. त्यामुळे सांगलीत जे झाले ते बरोबर झाले नाही, अशा शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर नाराजी व्यक्त केली. “वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या प्रस्तावासाठी काँग्रेसने एक पाऊल पुढे टाकले आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या मित्र पक्षांनीही तो प्रस्ताव मान्य करावा,” असे आवाहनही पटोले यांनी केले.

logo
marathi.freepressjournal.in