महाराष्ट्र
मोठी बातमी! नाशिकच्या निफाड तालुक्यात सुखोई विमान कोसळले
एका द्राक्षाच्या मळ्यात हे विमान कोसळल्याचे समजते. स्थानिक पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरू
नाशिकमधील निफाड तालुक्यातील शिरसगाव येथे मंगळवारी भारतीय हवाई दलाचे (IAF) सुखोई 30 हे लढाऊ विमान कोसळले आहे. शिरसगावमधील एका द्राक्षाच्या मळ्यात हे विमान कोसळल्याचे समजते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पायलटने पॅराशूटच्या सहाय्याने वेळीच उडी घेतली, असे नाशिक ग्रामीणचे पोलीस अधिक्षक विक्रम देशमाने यांनी सांगितले. हा अपघात नेमका कसा झाला हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.
IAF सुखोई-30 चा एअर बेस पुणे येथे आहे, तेथूनच विमानाने उड्डाण घेतल्याचे सांगितले जात आहे. तथापि, याबाबत अधिकृत माहिती नाही. स्थानिक पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरू आहे.