पुणे : स्वतःच्या खासगी ऑडी गाडीवर लाल दिवा लावून फिरणाऱ्या आणि अवाजवी सरकारी सोयीसुविधांची मागणी करत चमकोगिरी करणाऱ्या भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिची आई मनोरमा हिने मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांना पिस्तुलाचा धाक दाखविला होता. या प्रकरणी फरार झालेल्या मनोरमा खेडकर हिला रायगड जिल्ह्यातील महाड येथून अटक करण्यात आली. त्यानंतर तिला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील धडवली गावातील शेतकऱ्यांना मनोरमा खेडकरने बाऊन्सर व पिस्तुलच्या धाकाने धमकावल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी याबाबत संबंधित शेतकऱ्यांची वर्षानंतर तक्रार दाखल करून घेत पौड पोलीस ठाण्यात पूजाच्या आईवडिलांसह सात जणांवर गुन्हा दाखल केला. यानंतर पसार झालेल्या मनोरमा खेडकर हिच्या मागावर पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक (एलसीबी) होते. त्यांनी रायगड जिल्ह्यातील महाड येथून तिला ताब्यात घेऊन पुण्यात आणून अटक केली.
बंगल्याबाहेरील अतिक्रमण हटविले
भारतीय प्रशासकीय सेवेतील वादग्रस्त परिविक्षाधीन अधिकारी पूजा खेडकर यांच्या औंधमधील कुटुंबीयांच्या बंगल्याबाहेरील रस्त्यावरचे अतिक्रमण हटवण्यात आले आहे. हे अतिक्रमण काढून घ्यावे, अन्यथा कारवाई केली जाईल, अशी नोटीस महापालिकेने दिली होती. त्यानंतर खेडकर कुटुंबीयांकडून हे अतिक्रमण हटवण्यात आले आहे.
...पण पोलिसांनी शोधलेच
मनोरमा खेडकर हिच्या अटकेबद्दल माहिती देताना पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख म्हणाले, मनोरमा खेडकर हिला पुणे पोलिसांनी गुरुवारी किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणी वाडी इथून अटक केली. मनोरमा खेडकर आणि त्यांच्या सोबत एक व्यक्ती रात्री ९.३० वाजता हिरकणी वाडी इथे आले. तेथील पार्वती हॉटेल इथे ती बनावट नावाने राहिली. दादासाहेब ढाकणे व इंदुताई ढाकणे अशी नावे त्यांनी मालकाला दिली. तसे आधारकार्ड देखील दाखवले. रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास पुणे पोलीस हिरकणी वाडी इथे पोहोचले. त्यांनी इथल्या सर्व लॉजेसची कसून तपासणी केली. अखेर मनोरमा खेडकर ज्या हॉटेलमध्ये राहिली होती तेथे पोहोचले. मनोरमा खेडकर याच ठिकाणी राहत असल्याची खात्री झाल्यानंतर सकाळी ६.३० वाजता ताब्यात घेण्यात आले.
तीन दिवसांची पोलीस कोठडी
दरम्यान, स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद करून पोलीस मनोरमाला पुण्याला घेऊन आले. त्यानंतर सर्व प्रक्रिया पूर्ण करून तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी मनोरमा खेडकरला न्यायालयात हजर केले. पोलिसांनी सात दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने मनोरमा खेडकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
नवीन कलम वाढवले
मनोरमा खेडकरवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे कलम ३०७ वाढवण्यात आले आहे. आधी फक्त शेतकऱ्यांना धमकावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. नवीन कलम वाढ झाल्यामुळे मनोरमा खेडकरच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता या संपूर्ण प्रकरणामध्ये मनोरमा खेडकरच्या अडचणी वाढल्या आहेत.