मराठा आरक्षण प्रश्नी इचलकरंजीत चक्का जाम

सकाळी दहा ते अकरा या वेळेत हे चक्काजाम आंदोलन झाल्यामुळे शहरामध्ये एकही वाहन प्रवेश करु शकले नाही.
मराठा आरक्षण प्रश्नी इचलकरंजीत चक्का जाम

इचलकरंजी :ठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसह अंतरवाली सराटी येथे सुरु असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठींबा दर्शवत इचलकरंजी सकल मराठा समाजाच्या वतीने शहरात येणार्‍या चारही प्रमुख मार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. सुमारे तासभर सुरु असलेल्या या आंदोलनामुळे चारी दिशेला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे यासाठी महात्मा गांधी पुतळा चौक येथे मराठा मंडळाचे माजी अध्यक्ष सुनिल शेलार, विजय पाटील आणि अरुण मस्कर या तिघांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. या उपोषणाला शहर व परिसरातील विविध राजकीय पक्ष, संघटनांसह नागरिकांनी भेट देत आपला पाठिंबा दर्शविला.

मागील चार दशकापासून आरक्षणाचा लढा सुरु आहे. अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरु केले असून त्याचे पडसाद संपूर्ण राज्यभरात उमटत आहेत. त्याच अनुषंगाने दोन दिवसांपूर्वी इचलकरंजी सकल मराठा समाजाच्यावतीने लाक्षणिक उपोषण करण्यात आले. तर बुधवारी शहरात येणार्‍या नदीवेस नाका, कोल्हापूर नाका, सांगली नाका आणि पंचगंगा साखर कारखाना या मार्गावर चक्काजाम केल्याने गावात येणारी संपूर्ण वाहतूक ठप्प झाली होती. तर कबनूर-कोल्हापूर रोडवरील ओढ्यावर रस्त्यावर टायर पेटवून टाकण्यात आले होते. हा प्रकार वगळता शहरातील आंदोलन शांततेत पार पडले.

सकाळी दहा ते अकरा या वेळेत हे चक्काजाम आंदोलन झाल्यामुळे शहरामध्ये एकही वाहन प्रवेश करु शकले नाही. यावेळी मराठा आरक्षण संदर्भात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलकांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. या आंदोलनाचा नोकरदार, विद्यार्थी आणि नागरिकांना त्रास सोसावा लागला. आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील मध्यवर्ती बस स्थानकातून जाणारी संपूर्ण एस.टी. सेवा तासभर बंदच ठेवण्यात आली होती.

logo
marathi.freepressjournal.in