

मुंबई : कौन्सिल फॉर दी इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन या शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या दहावी (आयसीएसई) आणि बारावी (आयएससी) परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आला. देशाचा दहावी परीक्षेचा निकाल ९९.१८ टक्के लागला, तर बारावीचा निकाल ९९.१३ टक्के लागला आहे. या दोन्ही परीक्षांमध्ये देशातील मुलींनी बाजी मारली आहे.
देशामध्ये दहावीच्या परीक्षेमध्ये मुलींचा निकाल ९९.४६ टक्के, तर बारावीमध्ये ९९.४८ टक्के इतका निकाल लागला आहे, तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनीही दोन्ही परीक्षेत घवघवीत यश मिळवले असून दहावी परीक्षेचा राज्याचा निकाल ९९.९३ टक्के तर बारावी परीक्षेचा निकाल ९९.८८ टक्के लागला आहे.
या दोन्ही परीक्षांचा निकाल विद्यार्थ्यांना कौन्सिल फॉर दी इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (सीआयएससीई) च्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येणार आहे. आयसीएसई परीक्षेत ६७ विषयांचा समावेश होता. यामध्ये २० भारतीय आणि १४ परदेशी भाषांचा समावेश होता, तर आयएससी परीक्षेत ४५ विषय घेण्यात आले, ज्यात १३ भारतीय आणि २ परदेशी भाषा होत्या.
देशभरातून आयसीएसई परीक्षेसाठी २ लाख ५८ हजार ७२१ विद्यार्थी बसले होते. त्यामध्ये मुलांची संख्या १ लाख ३७ हजार ५०३ तर मुलींची संख्या १ लाख २१ हजार २१८ इतकी होती. दहावीच्या परीक्षेला बसलेल्या या विद्यार्थ्यांपैकी २ लाख ५६ हजार ५९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये मुलांची संख्या १ लाख ३६ हजार ३२ (९८.९३ टक्के) तर मुलींची संख्या १ लाख २० हजार ५५८ (९९.४६ टक्के) इतकी होती. निकालाची टक्केवारी ९९.१८ इतकी आहे.
आयसीएसईप्रमाणे आएससी म्हणजे बारावीचा निकालही मंडळाकडून जाहीर करण्यात आला. बारावीच्या परीक्षेला देशातून १ लाख ३ हजार ३१६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यामध्ये मुलांची संख्या ५४ हजार ११८, तर मुलींची संख्या ४९ हजार १९८ इतकी होती. बारावीच्या परीक्षेला बसलेल्या या विद्यार्थ्यांपैकी १ लाख २ हजार ४१४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये मुलांची संख्या ५३ हजार ४७२ (९८.८१ टक्के), तर मुलींची संख्या ४८ हजार ९४२ (९९.४८ टक्के) इतकी आहे. त्यामुळे बारावीच्या निकालाची टक्केवारी ९९.१३ इतकी आहे. आयसीएसई परीक्षेत पश्चिम विभागाचा निकाल सर्वाधिक ९९.८५ टक्के राहिला, त्यानंतर दक्षिण विभाग ९९.८१ टक्के निकाल लागला आहे. तसेच आयएसी परीक्षेत दक्षिण विभागाने ९९.८७ टक्के अव्वल स्थान पटकावले आहे, तर पश्चिम विभागने दुसरा क्रमांक पटकावताना ९९.५५ टक्के निकाल लागला आहे.
९९.४६ टक्के मुली उत्तीर्ण
आयसीएसई व आयएससी या दोन्ही परीक्षांमध्ये देशविदेशामध्ये मुलींनी पुन्हा बाजी मारली आहे. आयसीएसईमध्ये ९९.४६ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत, तर मुलांच्या उत्तीर्णतेचा टक्का ९८.९३ टक्के राहिला आहे. तसेच आयएससीमध्ये ९९.४८ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत, तर ९८.८१ टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत.
महाराष्ट्राचा निकाल ९९ टक्क्यांहून अधिक
महाराष्ट्रातून आयसीएसईला परीक्षेला ३० हजार ३९३ विद्यार्थी बसले होते. यामध्ये मुलांची संख्या १६ हजार १८१ आणि मुलींची संख्या १४ हजार २१२ होते. यातील ३० हजार ३७२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये मुले व मुलींच्या उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९९.९३ टक्के इतके आहे. तसेच अयएससी परीक्षेला बसलेल्या ४ हजार ६१ विद्यार्थ्यांपैकी ४ हजार ५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९९.९५ टक्के तर मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९९.७९ टक्के इतके आहे.