
मुंबई : भारतीय शालेय प्रमाणपत्र परीक्षा परिषदेने अर्थात ‘कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन’मार्फत (सीआयएससीई) घेण्यात आलेल्या दहावी (आयसीएसई) आणि बारावी (आयएससी) परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. दहावीचा निकाल ९९.०९ टक्के तर बारावीचा निकाल ९९.०२ इतका लागला आहे. या परीक्षांमध्ये महाराष्ट्राने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.महाराष्ट्रामध्ये दहावीचा निकाल ९९.९० टक्के तर बारावीचा निकाल ९९.८१ टक्के इतका लागला. राज्यात दहावीच्या निकालामध्ये ९९.९२ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर ९९.८९ टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. तसेच बारावीच्या निकालामध्येही मुलींनी बाजी मारली आहे. बारावीच्या निकालामध्ये मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९९.९५ टक्के तर मुलांचे प्रमाण ९९.६५ टक्के आहे.
‘आयसीएसई’च्या दहावी परीक्षेला २ लाख ५२ हजार ५५७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यापैकी २ लाख ५० हजार २४९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर २ हजार ३०८ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये मुलांची संख्या १ लाख ३३ हजार १३९ तर मुलींची संख्या १ लाख १७ हजार ११० इतकी आहे.
फडणवीसांच्या मुलीला ९२.६० टक्के गुण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कन्या दिविजा फडणवीस हिला दहावीच्या परीक्षेत तब्बल ९२.६० टक्के गुण पडले आहेत. अमृता फडणवीस यांनी एका ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. मुख्यमंत्र्यांची मुलगी दिविजा फडणवीस ही मुंबईतील फोर्ट येथील कॅथेड्रल स्कूलमध्ये शिक्षण घेत होती. यावर्षी तिने दहावी बोर्डाची परीक्षा दिली असून तिने घवघवीत यश संपादन केले आहे.