लिलाव बंद ठेवल्यास परवाना रद्द ;सरकारचा कांदा व्यापाऱ्यांना निर्वाणीचा इशारा

नाशिक जिल्ह्यात विंचूर आणि निफाड या दोन उपबाजार समित्यांसह बाजार समित्यांमध्ये शनिवारी, केंद्राच्या निर्णयाच्या निषेधार्थ बाजारपेठेत कांदा लिलाव बंद ठेवण्यात आले होते.
लिलाव बंद ठेवल्यास परवाना रद्द ;सरकारचा कांदा व्यापाऱ्यांना निर्वाणीचा इशारा

नाशिक : कांदा निर्यातबंदीमुळे राज्यभर शेतकऱ्यांचा रोष वाढला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव बंद ठेवले आहेत, तर शेतकऱ्यांनी आंदोलने देखील सुरू केली आहेत. यामुळे आता सरकारने गंभीर पावले उचलली असून सलग तीन दिवस व्यवहार बंद ठेवल्यास व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करण्याचा इशारा दिला आहे.

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ३१ मार्च २०२४ पर्यंत बंदी घातली आहे. या निर्णयामुळे कांदा उत्पादक संतप्त झाले आहेत. त्यातच कांद्याचे सर्व लिलावही ठप्प झाले आहेत. निर्यातीस पाठवण्यात येणारे तब्बल १७० कंटेनर मुंबईत अडकून पडले आहेत. यामुळे हा कांदा सडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे राज्य सरकारने हे व्यवहार सुरळीत करण्यासाठी व्यापाऱ्यांना तंबी दिली आहे. सलग तीन दिवसांपेक्षा जास्त काळ बाजार समिती बंद राहिल्यास व्यापाऱ्यांचे परवाने रद्द केले जाणार आहेत. याबाबत सहकार विभागाकडून बाजार समित्यांना पत्र पाठवण्यात आले आहे. लिलावात सहभागी न होणाऱ्या व्यापाऱ्यांचे परवाने रद्द केले जाणार आहेत. त्यामुळे गाळाधारक व्यापाऱ्यांनी तीन दिवसांच्या आत आपले व्यवहार पूर्ववत करण्याचे आवाहन सहकार विभागाने केले आहे. शुक्रवारी राज्यात ठिकठिकाणी आंदोलने केल्यावर कांदा लिलाव बंद करण्यात आले होते. त्याला जिल्ह्यातील बाजार समितीत प्रतिसाद मिळत आहे.

नाशिक जिल्ह्यात विंचूर आणि निफाड या दोन उपबाजार समित्यांसह बाजार समित्यांमध्ये शनिवारी, केंद्राच्या निर्णयाच्या निषेधार्थ बाजारपेठेत कांदा लिलाव बंद ठेवण्यात आले होते. सहकार विभागाने राज्यातील सर्व जिल्ह्यातील बाजार समित्यांत काय परिस्थिती आहे, याची माहिती घेतली. नाशिक जिल्ह्यात जवळपास कांदा व्यवहार बंद असल्याचे निरीक्षण सहकार विभागाने नोंदवले आहे. दरम्यान, ही निर्यात बंदी मागे घेतली नाही तर संपूर्ण देशात मोठे आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी दिला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in