मुंबई : इंग्रजांना घालवू शकलो तर, मोदी काय चीज आहे? असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. शरद पवार यांची आज, ११ मे रोजी पुण्यातील हडपसर येथे सभा पार पडली. शिरूर मतदारसंघाचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी सभा घेतली होती. या सभेतून शरद पवार यांनी वेगवेगळ्या विषयावरून मोदींवर हल्लाबोल केला आहे.
शरद पवार म्हणाले, "ज्यांच्या साम्राज्याचा सूर्य मावळत नाही, असे म्हणणारे इंग्रज होते, त्यांनी वर्षानुवर्ष या देशावर राज्य केले, त्यांना घालवण्यासाठी महात्मा गांधींचे विचार घेऊन कोट्यवधी लोक एकत्र आले आणि यशस्वी झाले. ते इंग्रजांना घालवू शकलो तर, मोदी हे काय चीज आहे?, यांचा विचार आपल्या सर्वांना करावा लागेल. त्यामुळे आज परिवर्तनाचा विचारांची अत्यंत आवश्यकता आहे आणि ते काम करायचे असेल तर, आपल्या सगळ्यांना एकत्र येवून काम करावे लागेल. त्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे", असे आवाहन शरद पवार यांनी भाषणातून केले.
तुमचा पक्ष आणि विचार तुम्हाला लखलाभ
"आपल्या देशात गांधी आणि नेहरू यांचे विचार मजबूत करण्याची आज आवश्यकता आहे, असे विधान मी केले होते. तर त्यांनी (मोदींनी) उत्तर दिले की, आमच्या पक्षात या. त्यांच्या पक्षात कोण जाणार, त्यांच्या पक्षात व्यक्ती स्वातंत्र्य नाही. त्यांच्या पक्षात देशाच्या ऐक्याचा विचार नाही. जिथे जातीयवादी आणि धर्मवादी विचारांचा पुरस्कार केला जातो, त्या पक्षाच्या आसपाससुद्धा मी काय किंवा उद्धव ठाकरे काय? आम्ही आयुष्यात कधी उभे राहणार नाही. या लोकांना सत्तेतून बाहेर काढण्यासाठी आम्ही शक्ती लावत आहोत आणि हे आमचे राष्ट्रीय कर्तव्य आहे. मोदी तुमचा पक्ष आणि विचार तुम्हाला लखलाभ", असे शरद पवार म्हणाले.