

इगतपुरी : इगतपुरी परिसरात वनविभाग महाराष्ट्रच्या पथकाने धडक कारवाई करत एका भोंदूबाबाच्या बेकायदेशीर कृत्यांचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत आरोपी चंद्रकांत राजेंद्र माळी (३३) याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून वन्यजीवांचे विविध अवयव मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आले आहेत.
गिरणारे परिसरात एक व्यक्ती भोंदूगिरीच्या आडून वन्यजीवांच्या अवयवांची तस्करी करत असल्याची गुप्त माहिती वनविभागाला मिळाली होती. त्यानुसार वनविभागाच्या पथकाने नियोजनबद्ध सापळा रचून आरोपीच्या घरावर छापा टाकला. छाप्यात घरातून वन्यजीवांचे मोठे साठे आढळून आले. यामध्ये रानडुकराचे दात, सांबर व काळवीटाची शिंगे, घुबडाचे अवयव, सालिंदरचे काटे, मोरपिसे तसेच एक तलवार असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त मालाची अंदाजे किंमत सुमारे २ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. वनविभागाने आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सर्च वॉरंट फाडून गिळण्याचा प्रयत्न
वनविभागाचे अधिकारी अधिकृत सर्च वॉरंट घेऊन आरोपीच्या घरी पोहोचले असता, आरोपीने आपला गुन्हा लपवण्यासाठी व कारवाईत अडथळा आणण्यासाठी ते वॉरंट फाडून तोंडात टाकून चावून गिळण्याचा प्रयत्न केला. मात्र, अधिकाऱ्यांनी तत्काळ हस्तक्षेप करत त्याला ताब्यात घेतले.