शेतकरी नकली ‘एचटीबीटी’ बियाणाच्या प्रेमात; गुजरातमधून होते राज्यात आवक, कृषी विभागाने दिला कारवाईचा इशारा

सध्या सर्वत्र खरीप हंगामाची तयारी सुरू आहे. पावसाच्या उघडीपीने शेतशिवारात आंतरमशागतींच्या कामांना वेग आला असून, बाजारपेठांमध्ये कृषी उत्पादन खरेदीसाठी शेतकऱ्यांची झुंबड उडाल्याचे दिसून येत आहे. खरीपाच्या पेरण्यांना अद्याप अवधी आहे. मात्र, सिंचनस्थित भागातील बागायतदार शेतकऱ्यांनी कपाशी लागवड सुरू केली आहे.
शेतकरी नकली ‘एचटीबीटी’ बियाणाच्या प्रेमात;  गुजरातमधून होते राज्यात आवक, कृषी विभागाने दिला कारवाईचा इशारा
Published on

छत्रपती संभाजीनगर : सध्या सर्वत्र खरीप हंगामाची तयारी सुरू आहे. पावसाच्या उघडीपीने शेतशिवारात आंतरमशागतींच्या कामांना वेग आला असून, बाजारपेठांमध्ये कृषी उत्पादन खरेदीसाठी शेतकऱ्यांची झुंबड उडाल्याचे दिसून येत आहे. खरीपाच्या पेरण्यांना अद्याप अवधी आहे. मात्र, सिंचनस्थित भागातील बागायतदार शेतकऱ्यांनी कपाशी लागवड सुरू केली आहे. विशेष बेकायदेशी एचटीबीटी काळाबाजार यंदाही सुरू असल्यामुळे कृषी विभाग आणि उत्पादन विक्रेते कमालीचे अस्वस्थ असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.

यात अस्सल एचटीबीटीच्या नावाखाली नकली एचटीबीटी बियाणे देखील शेतकऱ्यांच्या माथी मारले जाण्याची शक्यता कापूस तज्ज्ञांनी वर्तविली असून, अशाप्रकारे जर कोणी बेकायदेशीर एचटीबीटीची विक्री करताना आढळल्या कडक कारवाईचा स्पष्ट इशारा कृषी विभागाच्या वतीने देण्यात आला आहे. यावर्षी कधी नव्हे इतक्याप्रमाणात बाजारपेठेत अवैधरित्या एचटीबीटी कापूस बियाणाची विक्री सुरू असल्यामुळे बियाणे उत्पादक कंपन्या, विक्रेत्यांमध्ये कमालीचा संभ्रम निर्माण झाला आहे. समाधानकारक मिळणारे उत्पादन, कीड आणि रोगांचा अल्प प्रमाणात प्रादुर्भाव, तणनाशकाचा वापर, बाजारभावाचा अभाव आदी सबबींमुळे कापूस शेतकरी एचटीबीटी बियाणाचा आग्रह धरीत असल्याचे कृषी उत्पादन विक्रेत्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

कृषी उत्पादन विक्रेते अडचणीत

एचटीबीटी कापूस बियाणे हे अनधिकृतरित्या गुजरातमधून विक्रीला मोठ्या प्रमाणात मराठवाड्यात येत आहे. कीड आणि रोग प्रतिकारशक्ती आणि उत्पादनक्षमता यामुळे शेतकरी चोरी-छुप्या पद्धतीने एचटीबीटी खरेदी करीत असल्याची माहिती आहे. या तंत्रज्ञानाला शासनाने अद्याप परवानगी दिलेली नसल्याने हा कोट्यवधींचा व्यवहार छुप्या मार्गाने मात्र सर्रास सुरू आहे. खान्देश आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात कापूस उत्पादक शेतकरी बेकायदेशीर मार्गांनी अव्वाची सव्वा किंमत मोजून एचटीबीटी बियाणे घेत आहेत. त्यामुळे अधिकृत कृषी उत्पादन विक्रेत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

बीटीची दरवाढही कारणीभूत

एचटीबीटीची छुप्या पद्धतीने विक्री सुरू असल्यामुळे मान्यताप्राप्त अस्सल बीटी बियाणे उत्पादक कंपन्यांचे विक्रेते, वितरक अडचणीत सापडले आहेत. विक्रेते, वितरकांकडे अधिकृत कंपन्यांचे विविध प्रकारच्या बीटी कापूस बियाणांचा साठा मोठ्या प्रमाणावर पडून आहे. महागडे बीटी बियाणे, त्यातुलनेत कापसाला मिळणारा बाजारभाव यामुळेही यंदा एचटीबीटी कापूस बियाणे परवडते, असे शेतकरी खासगीत बोलत आहेत. त्यामुळेच गुजरातमधून छुप्या मार्गाने येत असलेल्या अनधिकृत एचटीबीटी बियाणाला मागणी असल्याचे सूत्रांनी सांगितले.

एचटीबीटीला गुजरात राज्यात परवानगी आहे. मात्र, महाराष्ट्र शासन कापूस अधिनियमाद्वारे एचटीबीटीच्या वितरणाला परवानगी नाही. मागील वर्षी एचटीबीटी विक्रीप्रकरणी कृषी विभागाकडून कारवाई करण्यात आली होती. यंदाही बाजारात छुप्या पद्धतीने एचटीबीटीची विक्री होत असल्याचे समजते. मात्र, अशा प्रकारे अनधिकृतपणे जर कोणी एचटीबीटीची काळ्या बाजारात कोणी विक्री करत असतील, तर अशा व्यापऱ्यांवर, किक्रेत्यांवर कारवाई करण्यात येईल. - प्रकाश देशमुख, प्रभारी कृषी सहसंचालक

logo
marathi.freepressjournal.in