पाचगणीत बेकायदा उत्खनन; गौण खनिजासह वाहने जप्त, शासकीय कामात अडथळाप्रकरणी गुन्हा

महाबळेश्वर महसूल विभागाने धडक कारवाई करत उत्खननासाठी वापरण्यात आलेले जेसीबी व ट्रॅक्टर ही वाहने व उत्खनन केलेले गौणखनिज जप्त केले. तसेच पंचनामा करताना शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला
पाचगणीत बेकायदा उत्खनन; गौण खनिजासह वाहने जप्त, शासकीय कामात अडथळाप्रकरणी गुन्हा
Published on

कराड : महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी पालिका हद्दीतील किरण घनंजय सालने व प्राजक्ता प्रसाद हसबनीस रा. पाचगणी, ता. महाबळेश्वर यांच्या पांचगणी येथील मिळकतीत सुरू असलेल्या विनापरवाना उत्खननावर महाबळेश्वर महसूल विभागाने धडक कारवाई करत उत्खननासाठी वापरण्यात आलेले जेसीबी व ट्रॅक्टर ही वाहने व उत्खनन केलेले गौणखनिज जप्त केले. तसेच पंचनामा करताना शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला असल्याची माहिती महाबळेश्वरच्या तहसिलदार तेजस्विनी पाटील यांनी दिली आहे.

पाचगणी नगर पालिका हद्दीतील शरद पंडित स्टेडियम नजीकच्या अंतिम भूखंड क्र. टी. पी. स्कीम ०३.५३३ मध्ये अनमोल कांबळे व त्याचे सहकारी हे बेकायदा उत्खनन करून तेथील बांधकामाच्या कॉलमच्या बाजूस मुरूम टाकून त्याचे सपाटीकरणाचे काम करत असल्याबाबत माहिती महसूल विभागास मिळाली होती. या माहितीच्या आधारे पांचगणीचे ग्राम महसूल अधिकारी तलाठी व मंडल अधिकारी यांनी जागेवर जाऊन पाहणी केली असता, त्याजागी विनापरवाना उत्खनन सुरू असल्याचे निदर्शनास आले.

महसूल अधिकाऱ्यांनी घटनेचा तेथे पंचनामा करताना अनमोल कांबळे व त्याचे सहकारी यांनी पंचनामा करण्यास अटकाव करत शासकीय कामात अडथळा आणला. त्यामुळे कांबळे यांच्यासह त्याच्या सहकाऱ्यांवर ग्राम महसूल अधिकारी तलाठी व मंडल अधिकारी यांनी पाचगणी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला. त्यानंतरही कांबळे याने समाज माध्यमावर प्रशासनाची बदनामी केली व त्याच जागी रात्रीच्या अंधारात पुन्हा उत्खनन चालू केले. मात्र या कामाची माहिती तहसीलदार तेजस्विनी पाटील यांना समजताच त्यांनी थेट जागेवर जावून धडक कारवाई करत उत्खनन करण्यासाठीची पोकलेन मशीन व ट्रॅक्टर ट्रॉली व उत्खनन केलेले गौणखनिज जप्त केले. सध्या ही वाहने पाचगणी पोलीस ठाण्यात पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहेत.

या कारवाईमध्ये तहसीलदार तेजस्विनी पाटील, क्षेत्रीय महसूल अधिकारी रुपेश शिंदे, पाचगणीचे मंडलाधिकारी सागर शिंदे, तलाठी तथा ग्राम महसूल अधिकारी, कर्मचारी यांच्यासह पाचगणी पोलीस यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

अन्य प्रकरणात ८ लाखांची दंड वसुली

काहीच दिवसांपूर्वी महाबळेश्वर तालुक्यातील मौजे भोसे येथे स. नं. २६/३/५ अ मध्ये देखील उत्खनन झाल्याची माहिती महसूल विभागास मिळाली होती. या कारवाईमध्ये संबंधितांवर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८ (७) (८) अन्वये माती उत्खनन व वाहनावरील दंड असे एकूण रु ८,४१,८००/- ची दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती तहसीलदार तेजस्विनी पाटील यांनी दिली.

महाबळेश्वर तालुका हा पर्यावरणदृष्ट्या अतिसंवेदनशील तालुका आहे. कोणत्याही जागेमध्ये विकसनाचे काम करीत असताना शासन नियमातील अटी व शर्तीचे काटेकोरपणे पालन करावे. विनापरवाना व बेकायदेशीरपणे कोणीही उत्खनन अथवा गौणखनिजाची वाहतूक करू नये तसेच गौणखनिज उत्खननाबाबत तहसिल कार्यालयाकडून कोणत्याही रकमेची मागणी केली जात नाही. - तेजस्विनी पाटील, तहसिलदार, महाबळेश्वर

logo
marathi.freepressjournal.in