पोलादपूरमध्ये रेड्यांच्या झोंब्यांचे बेकायदेशीर आयोजन; दोघांविरुध्द गुन्हा

पोलादपूरमध्ये रेड्यांच्या झोंब्यांचे बेकायदेशीर आयोजन; दोघांविरुध्द गुन्हा

नवीन वर्षाच्या प्रारंभी महाडकडून रेड्यांच्या झोंब्यांचे आयोजन पोलादपूर तालुक्यात सुरू झाले.

पोलादपूर : तालुक्यात रेड्यांच्या झोंब्यांचे शौकीन मोठ्या प्रमाणात असून रेड्यांच्या झोंब्यांचे आयोजन करण्यासाठी बेकायदेशीर प्रयत्न गेल्या काही वर्षांपासून केले जात असतात. या झोंब्यांदरम्यान प्रतिस्पर्धी रेड्यांच्या पराभवासाठी मांत्रिक-तांत्रिकांचा वापर करत अंधश्रध्दा पसरविण्याचेही काम बेकायदेशीर उपक्रम राबविले जातात. मात्र,पोलादपूर तालुक्यातील भोगाव खुर्द येथे रेड्यांच्या झोंब्यांचे बेकायदेशीररित्या आयोजन केल्याने पोलादपूर पोलीसांनी दोन व्यक्तींविरुध्द गुन्हा दाखल केल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

नवीन वर्षाच्या प्रारंभी महाडकडून रेड्यांच्या झोंब्यांचे आयोजन पोलादपूर तालुक्यात सुरू झाले. विविध राजकीय व्यक्तींकडूनही रेड्यांच्या झोंब्यांसाठी मोठया प्रमाणात अर्थसहाय्य व देणग्या दिल्या गेल्या. गेल्या महिन्यामध्ये पोलादपूर तालुक्यामध्ये दोन ठिकाणी रेड्यांच्या झोंब्यांचे आयोजन यशस्वी झाल्यानंतर हजारो झोंबी शौकिनांची उपस्थिती दिसून आली. अशाचप्रकारच्या रेड्यांच्या झोंब्यांचे आयोजन पोलादपूर तालुक्यातील भोगाव खुर्द येथे गुरुवारी सकाळी ८ वाजून १० मिनीटांनी करण्यात आल्याचे पोलादपूर पोलीस ठाण्याला समजून आले. यावेळी या रेड्यांच्या झोंब्यांचे आयोजन भोगाव खुर्द येथील संदीप शांताराम शेलार आणि अक्षय काशिराम कदम यांनी जिल्हाधिकारी रायगड यांनी बजावलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून तसेच प्राण्यांना क्रूरतेने वागविल्याबद्दल पोलीस हवालदार स्वप्नील कदम यांनी फिर्याद दिली. ठाणे अंमलदार पोलीस नाईक महाडीक यांनी दखलपात्र गुन्हा रजिस्टर दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक उदय धुमास्कर हे पोलीस निरिक्षक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करीत आहेत.

प्रसारणाची लिंक नष्ट

रेड्यांच्या झोंब्यांच्या आयोजनाचे खासगी वृत्तवाहिन्यांकडून वृत्तांकन इंटरनेटवर प्रसारित होत असून काही कालावधीनंतर त्या प्रसारणाची लिंक नष्ट केली गेली. त्याच प्रमाणे प्रतिस्पर्धी रेड्यांच्या पराभवासाठी अनेक मांत्रिकतांत्रिक यांच्याकडून अघोरी प्रकार झोंब्यांच्या आयोजनाच्या शेतावर तसेच माळावर केले जात असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in